पुणे येथील महात्मा गांधी कुष्ठरोग वसाहत नियमित करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. 10 : समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय देणे हे शासनाचे धोरण असून त्यानुसार अंतुलेनगर, पिसोळी ता.हवेली, जि.पुणे येथील महात्मा गांधी कुष्ठरोग वसाहत नियमित करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. वन आणि महसूल विभाग यांनी योग्य समन्वयाद्वारे कुष्ठरोगग्रस्त नागरिकांना येथे कायमस्वरुपी हक्काची घरे देण्याबाबत उपाययोजना करावी. गेल्या 20 वर्षापासून हा विषय प्रलंबित रहावा, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता अधिक विलंब न करता आठ दिवसाच्या आत समन्वयाने हा प्रस्ताव सादर केला जावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 12 मार्च, 2025 रोजी अंतुलेनगर, पिसोळी येथील कुष्ठरोगग्रस्त नागरिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने “औचित्याचा मुद्दा” उपस्थित करुन या विषयाकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात विधान भवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर, विधानमंडळाचे सचिव (3) डॉ.विलास आठवले, वन विभागाचे मुख्य वन संरक्षक एन.आर.प्रवीण (पुणे), वन संरक्षक श्री.मोहिते, तहसीलदार किरण सुरोवसे, अवर सचिव (महसूल) संजय जाधव तसेच वसाहत प्रकल्प प्रतिनिधी स्नेहल दगडे, जान्हवी बोरसे उपस्थित होते. सदरहू वसाहत ही वन विभागाच्या जागेवर आहे. 40 टक्के अपंग प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना सरकारी जमीन देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाने सन 2004 मध्ये महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील कुष्ठरोगी वसाहती नियमित केल्या आहेत. याच धर्तीवर पिसोळी येथील वसाहत देखील नियमित करुन संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे सदस्य आमदार श्री. टिळेकर यांनी केली. त्यानुसार महसूल विभागाने आठ दिवसाच्या आत हा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सभापती प्रा. शिंदे यांनी दिले.

…….

किरण वाघ/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *