‘झाड’ हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक – केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

नवी दिल्ली, दि. 5 : झाड हे केवळ हिरवळीचे प्रतीक नसून ते, आईच्या ममतेने प्रतीक असल्याची भावना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जागतिक पर्यावरण दिनी महाराष्ट्र सदन येथे  वृक्षारोपण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला उपस्थित होत्या.

वृक्षारोपणानंतर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहकार मंत्रालयाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत मंत्रालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाप्रती आपली कटिबद्धता दर्शवली. आज लावलेले हे झाड केवळ हिरवळीचे प्रतीक नाही, तर ते आईच्या ममतेचे प्रेरित आहे, जिने  जीवन दिले, सांभाळले आणि प्रगतीची प्रेरणा दिली. प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टीने प्रेरित हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नाही, तर आईबद्दलच्या श्रद्धेला निसर्गाशी जोडते.

याच अभियानांतर्गत खासदार रवींद्र वायकर यांनीही महाराष्ट्र सदनात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले.

वृक्षारोपण कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉक्टर राजेश आडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे.पी.गंगवार, किरण चौधरी, प्रियंका नागे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील कर्मचारी उपस्थित होते.

0000

अंजू निमसरकर- माहिती अधिकारी/   वृत्त विशेष  -125

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *