स्वारगेट बस स्थानकातील महिला अत्याचारप्रकरणी चार अधिकारी निलंबित; २२ सुरक्षारक्षकांची बदली – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ११ : स्वारगेट बस स्थानकामध्ये महिला अत्याचार प्रकरणी कारवाई केली असून यामध्ये चार अधिकारी निलंबित आणि २२ सुरक्षारक्षकांची बदली करण्यात आली आहे असे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, काही दिवसांपूर्वी स्वारगेट बसस्थानकमध्ये शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेची गंभीर दखल  शासनाने घेऊन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी अहवालानुसार  प्रवाशांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाला जबाबदार ठरवून वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील येळे आणि सहायक वाहतूक अधीक्षक मोहिनी ढगे यांना निलंबित करण्यात आले असून स्वारगेट स्थानकावर कार्यरत असलेले २२ सुरक्षारक्षक बदलण्यात आले आहेत.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *