तांड्यांना गावठाण व ग्रामपंचायत घोषित करण्याची कार्यवाही गतीने करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.31 (जिमाका) : बंजारा समाजाचे वास्तव्य असलेल्या तांड्यांच्या विकासासाठी शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत बंजारा, लमाण तांडा घोषित करणे, गावठाण व तांड्यांना महसूली गाव, ग्रामपंचायत घोषित करण्याची कारवाई गतीने करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

महसूल भवन येथे त्यांनी संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक ऊईके, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, आ.राजू तोडसाम, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, अशासकीय सदस्य छाया राठोड, गोवर्धन राठोड, पंजाबराव पवार आदी उपस्थित होते.

तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत व सामुहिक विकासाच्या सुविधा निर्माण करून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. गावठाण, महसूली दर्जा व ग्रामपंचायत नसलेल्या तांड्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. एकही तांडा सुटणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. जिल्ह्यातील तांड्यांच्या विकासासाठी तीन वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी विविध विकासकामांसाठी मंजुर निधी खर्च करतांना प्राधान्याची कामे आधी घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

तांड्यांना ग्रामपंचायतींचा दर्जा देण्यासाठी शासनाने लोकसंख्येची अट एक हजार वरून 700 इतकी केली आहे. तसेच तांड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावातील अंतराची अट शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. योजनेंतर्गत जिल्ह्यात तांड्यात करावयाची १५३ विविध विकास कामे मंजूर झाली असून यासाठी १५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

The post तांड्यांना गावठाण व ग्रामपंचायत घोषित करण्याची कार्यवाही गतीने करा – पालकमंत्री संजय राठोड first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *