पुणे, दि. १३: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव कनिष्क कुमार, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) अभियंता उपस्थित होते.
श्री. चोक्कलिंगम यावेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याबाबत न्यायालयाने सुनावण्या घेऊन, पक्षकारांचे म्हणणे ऐकून ईव्हीएम पूर्णतः विश्वसनीय असल्याचा निकाल दिला. याबरोबरच लोकांच्या ईव्हीएममधील मायक्रोकंट्रोलर चीपबाबत ज्या तक्रारी, शंका आहेत त्या देखील दूर व्हाव्यात यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला निर्देशित केले. त्यादृष्टीने आयोगाने बीईएलच्या साहाय्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर या चीपमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करून निकालात बदल (मॅनीप्युलेशन) करण्यात आलेले नाही या बाबत नागरिकांची खात्री करणे यादृष्टीने या कार्यपद्धतीला महत्त्व आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा यासाठी ही कार्यपद्धती राबवायची आहे. त्यामुळे ही तपासणी व पडताळणी प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबविण्याची मोठी जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर आहे. ही नवीन पद्धती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घ्यावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. चोक्कलिंगम म्हणाले.
किरण कुलकर्णी म्हणाले, राजकीय पक्ष आणि उमेदवारांमधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने या कार्यपद्धतीबाबत संक्षिप्त माहिती देणे ही जिल्हा निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने पक्ष आणि उमेदवारांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी बीईएलच्या अभियंत्यांनी या तांत्रिक कार्यपद्धतीबाबत सादरीकरण केले तसेच ईव्हीएमच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मांडलेल्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
0000
The post निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी पारदर्शक पद्धतीने पडताळणी प्रक्रिया राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम first appeared on महासंवाद.