पुणे, दि. ९: शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबत त्यांच्या उत्पन्नात वाढ व त्या उत्पादनाला संरक्षित भाव मिळवून देण्यासाठी कृषी विभागाशी निगडित सर्व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, आगामी काळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा मानस कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.
ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यावतीने ९ ते १२ जानेवारी कालावधीत आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, उपसंचालक श्रीधर काळे, उप विभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहर, प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त, अध्यक्ष सुजित खैरे, माजी आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.
कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असून त्यांना या क्षेत्रात सुरक्षितता उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राला झाला पाहिजे, त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. यादृष्टीने त्यांनी तांत्रिक शेती, विविध संशोधन, दर्जेदार बी-बियाणे, खत उत्पादन, आदी बाबींवर भर दिला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. शेती आणि बाजारपेठ परस्परपूरक बाबी असल्याने शेतीमाल ते बाजारपेठ अशी साखळी निर्माण करण्याची गरज आहे. परवानाधारक दुकानदार यांनी प्रामाणित खते, बी-बियाणे घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांनावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
राज्यात विविध पीकपद्धती घेतली जाते, पारंपरिक पीकपद्धती आणि आधुनिक पीकपद्धती यांच्यामधील फरक समजून घेतला पाहिजे. अनेक शेतकरी प्रयोगशील असून कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोग करीत असतात. त्यांचे अनुकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतात नवनवीन तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक उत्पादन घेतले पाहिजे, याकरीता राज्यशासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. शेतीशी संबंधित केंद्र शासनाशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी चर्चा सुरु आहे, आगामी काळात केंद्र शासन आणि राज्य सरकार मिळून यामध्ये सकारात्मक मार्ग काढण्यात येईल.
कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळाव्यात याकरीता लवकरच उपयोजक (ॲप) विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासोबतच त्यांच्या वेळेत बचत होईल तसेच पारदर्शक पद्धतीने त्यांच्या खात्यात लाभाचे हस्तांतरण होईल. पीक नुकसानीचे पंचनामे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यासोबतच पीकविम्याच्या अनुषंगाने अडचणी दूर करण्यात येईल. कृषी विद्यापीठाच्या जमिनी कृषी विज्ञान केंद्र तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, शेतीतील पिकाची शाश्वती, शेतमालाला हमीभाव मिळवून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन धोरण तयार करण्यात येईल.
जुन्नर परिसर हा शेतीसाठी प्रयोगशील परिसर आहे. या परिसरात उत्पादित हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे, याकरीता राज्य शासनाने प्रयत्न केले. या कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रत्यक्ष शेतीत विविध प्रकारच्या प्रयोगाची अंमलबजावणी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केली असून शेतीशी निगडित नवीन ज्ञान याठिकाणी प्राप्त होते आणि ते शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक आहे.
आमदार श्री. सोनवणे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याची सेवा करणारे खाते म्हणून कृषी विभागाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, शेतकऱ्यांला कमी खर्चात अधिक उत्पन्न, शेतमालाला हमीभाव, अद्ययावत शेतकरी भवन, दूध अनुदान, पशुधनासाठी लसीचा पुरवठा, परिसरात बिबट्याची संख्या लक्षात घेता दिवसा वीज उपलब्ध करणे आदी प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांकरीता लोककल्याणकारी धोरण राबविण्याच्या श्री. सोनवणे यांनी सूचना केल्या.
श्री. मेहेर म्हणाले, शेतकऱ्यांना विकसित तंत्रज्ञानाचा लाभ मिळण्यासोबतच शेतकऱ्यांचे कमीतकमी खर्चात अधिकाअधिक गुणवत्तापूर्वक उत्पादनाच्यादृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेत. या प्रयत्नासाठी कृषी विज्ञान केंद्र नेहमी प्रयत्नशील आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार या केंद्रात नैसर्गिक शेती प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक पद्धती घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे, असेही श्री. मेहेर म्हणाले.
यावेळी डॉ. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘शिवनेरी हापूस आंबा’ लोगो आणि बॅसेलीस जैविक खते, जैवसंपृक्त पिके घडीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.
प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी मंत्री श्री. कोकाटे यांनी परिसरात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देवून माहिती घेतली. प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
0000
The post कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन first appeared on महासंवाद.