मुंबई, दि. 8 :- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाकडे वाटचाल करणे ही आपल्या राज्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी युवा पिढीने योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावी, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पी. पी. टी. चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघातील युवकांशी सह्याद्री अतिथीगृहात क्रीडामंत्री श्री. भरणे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या उत्स्फूर्त शैलीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.
क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले की, दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना राष्ट्रीय स्तरावरील संस्मरणीय असा अनुभव मिळणार आहे. खरंतर आपल्या युवकांचे उज्ज्वल भविष्य हेच आपल्या देशाचे आणि राज्याचे भविष्य आहे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपणच राष्ट्राची खरी शक्ती आहात. युवा पिढी सक्षम होण्यासाठी, युवकांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले की, पी. पी. टी. चॅलेंज स्पर्धेमध्ये दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. मिळालेल्या या संधीचे आपण सोनं करावे. युवा पिढीचा देशाच्या प्रगतीत सहभाग वाढावा या उदात्त हेतूने असे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी आपली निवड झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे स्पष्ट करत सर्वांना या पुढच्या काळात लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसचिव मंगेश शिंदे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे उपस्थित होते.
000000
राजू धोत्रे/विसंअ/
The post प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे first appeared on महासंवाद.