मुंबई, दि. 7 : राज्याच्या अतिपूर्वेकडील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध उद्योग उभारले जात आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होत असून औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेल्या या जिल्ह्यामध्ये कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे नवीन शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिल्या.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून अधिक समृद्ध व्हावा, उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ आणि स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मागणी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा. मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेनंतर यासाठी अधिक गती देऊन महाविद्यालय सुरू करण्यात येईल.
मंत्रालयात आज चंद्रपूर जिल्ह्यात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, उपसचिव अशोक मांडे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
The post चंद्रपूर जिल्ह्यात नवीन शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील first appeared on महासंवाद.