मुंबई, दि. ०६: शिक्षणसंस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे. यासाठी संस्था चालकांनी या शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यास पुढे यावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर नामांकित शिक्षण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींच्या चर्चासत्रात मंत्री श्री. भुसे बोलत होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे. देशाची आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षणसंस्था शिक्षण प्रसाराचे काम अविरतपणे करत आहेत. यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. संस्थेत शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्यात संस्थाचालकांची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा कृतिवर अधिक भर असल्याने शिक्षण संस्थेच्या चांगल्या कामास, उपक्रमास सहकार्य केले जाईल. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ, संस्थाचालक यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन शिक्षण विभागाचे काम समन्वयाने पुढे नेऊया. शिक्षण संस्थांच्या मागण्याबाबत शालेय शिक्षण विभाग नेहमीच सकारात्मक आहे.
चर्चासत्रात संस्थाचालक व संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, ११ वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे यासंदर्भातील मुद्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
चर्चासत्रास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, महेश पालकर, बालभारतीचे के.बी. पाटील आणि शिक्षण संस्था चालक व शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/
The post आनंददायी शिक्षणाद्वारे राज्याचा लौकिक वाढवा- मंत्री दादाजी भुसे first appeared on महासंवाद.