मुंबई, दि. ०१ : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळेल व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असे त्यांनी सांगितले.
मंत्री ॲड. शेलार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे.
मार्च २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी ₹१०,३७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.
केंद्र सरकार जानेवारी २०२५ पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधन ॲप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे.
आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रेसर राहिले पाहिजे, असेही मंत्री अॅड. शेलार यावेळी म्हणाले.
०००
The post महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा – मंत्री ॲड.आशिष शेलार first appeared on महासंवाद.