विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप

पुणे, दि. 30: पेरणे फाटा येथे 1 जानेवारी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना येथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 28) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

पेरणे येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी येत असतात. शासनाच्यावतीने त्यांना बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधांपर्यंत अनुयायांना लवकरात लवकर पोहोचता यावे व त्यांचा लाभ घेता यावा यासाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार करण्यात आले आहे.

हे ॲप https://initiatorstechnology.com/VijayStambhSuvidha.apk या लिंकवरून डाऊनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे. या ॲपमध्ये अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांचे गुगल लोकेशन मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ॲपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक त्या सुविधा निवडल्यास त्या सुविधेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुगल मॅपवर दिसतो व अनुयायांना इच्छित सुविधेपर्यंत पोहोचणे सोपे जाते, अशीही माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

0000

The post विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *