मुंबई दि. 26 : अतिधोकादायक आणि धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.
मंत्रालयीन दालनात कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कामगार विभागाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेतला.
कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, बाष्पके संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सर्वेक्षणानंतरही अपघात झाल्याचे आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अपघातग्रस्त कामगारांना शासन आर्थिक मदत देते मात्र, त्यांचा जीव वाचणे महत्वाचे असल्याने त्यादृष्टिने ठोस कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचना श्री. फुंडकर यांनी दिल्या.
माथाडी कामगारांची नोंदणी वाढण्यासंदर्भात कार्यवाही करावी, माथाडीकामगार संहिता सुधारणे संदर्भात उपाययोजना आखण्यात याव्यात, असे निर्देश श्री.फुंडकर यांनी दिले. यावेळी असंघटीत कामगार, श्रम एवम रोजगार मंत्रालयाचे ई-श्रम पोर्टल, महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, राज्य कामगार कायदे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांची संरचना आणि कामांबाबत आढावा कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी घेतला.
बैठकीत असंघटीत कामगार, विकास आयुक्त तुकाराम मुंढे, कामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोड, औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे संचालक दिलिप पोफळे, संचालक ध.प्र. अंतापूरकर, बांधकाम कामगार इतर कल्याणकारी मंडळाचे विवेक कुंभार आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/
The post धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे – कामगार मंत्री आकाश फुंडकर first appeared on महासंवाद.