एड्स प्रतिबंधामध्ये युवकांची मोलाची भूमिका

०१ डिसेंबर जागतिक एड्स दिन. या जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या सप्ताहामध्ये एड्स जनजागृती सप्ताह अभियानामध्ये जिल्हा रूग्णालयाकडून विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊ या… सामाजिक ऋण तसेच राष्ट्रीय कार्यास हातभार लाऊया… या दिनान‍िमित्त हा विशेष लेख.

“भला जन्म हा तुला लाभला खुलास – हृदयी बुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा”

सुप्रसिद्ध लावणीकार, कवी राम जोशी मानवी नरदेहाबाबत वर्णन करताना ही लावणी गायलेली आहे. चौऱ्यांशी दशलक्षकोट्या योन्या फिरल्यानंतर मानवाला दुर्लभ असा नरदेह प्राप्त होतो. त्यामुळे त्याने या देहाचा उपयोग विधायक कार्यासाठी करणे आवश्यक आहे. परंतु आज वाढती व्यसनाधिनता नैतिक मुल्याचा ऱ्हास, तसेच सहजीवनाचा वाईट परिणाम देशातील लोकांवर मुख्यत्वे करुन युवकांवर पडत असलेला पहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम देशाची भावी आधारस्तंभ असणारी तरुण पिढी ही एचआयव्ही संक्रमणाला बळी पडत असलेली पहावयास मिळते. मानवी भावना या नैसर्गिक असतात. परंतु या भावनांचा उद्रेक म्हणजेच विनाशास निमंत्रण असते. त्यामुळे त्यामध्ये सुवर्णमध्य साधणे आवश्यक असते.

तारुण्याचे तीन ‘त’कार”

तेजस्वीतता, तपस्वीतता, तत्परता हे तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत. हे प्रत्यक तरुण-तरुणीमध्ये असले पाहिजेत. परंतु खरोखरच हे तिन्ही गुण आपल्या स्वतः मध्ये आहेत का ? या प्रश्नाचे आत्म संशोधन करण्याची आज वेळ आली आहे. कारण नैतिक शिक्षण आवश्यक झालेले आहे. त्यामुळे व्यक्तीला गतिमानता प्राप्त होण्यास मदत होईल. आजचा युवक व्यसनरूपी चक्रव्युव्हामध्ये अडकत आहे. ज्याचे पर्यावसन १५ ते ४९ या वयोगटातील लोकच आज जास्तीत जास्त व्यसनाधीन, एचआयव्ही बाधित पहावयास मिळताहेत.

एचआयव्ही संक्रमणाला बळी पडण्याचे महत्त्वाचे कारण हे या रोगाबद्दल असलेले अपुरे ज्ञान. तारुण्य अवस्थेतील जल्लोष आहे. त्यामुळे आजच्या युवांनी या आजाराबाबत प्रशिक्षित समुपदेशक, सल्लागार यांच्या मार्फत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे. आयसीटीसी केंद्र यामध्ये (दिशा केंद्रामध्ये) येणाऱ्या सर्व व्यक्तींना एचआयव्ही, एड्स बाबत संपूर्ण शास्त्रीय माहिती दिली जाते. तसेच त्यांच्या संमतीनेच त्यांची एचआयव्ही चाचणी केली जाते. चाचणीपूर्व तपासणीमध्ये चाचणी नंतरच्या निष्कर्षाबाबत समोरील व्यक्तीला कल्पना दिली जाते. तपासणीबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. चाचणी पश्चात समुपदेशनामध्ये समोरच्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीय मुल्याचा अभ्यास करुन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन केले जाते.

“गळणाऱ्या पानांकडे नसते झाडाचे कधी लक्ष – नव्या पालवीलाच असते गोंजारण्यात ते दक्ष”

तात्पर्य, परिवर्तन हा काळाचा नियम आहे. या चराचर सृष्टीची निर्मिती ज्या निर्मिकाने उदात्त धोरणाने केली,  तो उद्देश सफल करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संस्कृतीचा वारसा आपण जोपासला पाहिजे. परंतु नवीन इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप च्या संस्कृतीमध्ये आपण आपली जुनी संस्कृती, नितीमुल्य पायदळी तुडवता कामा नये. वाढती फॅशन, अंगप्रदर्शन तसेच संयमहीन जीवन यामुळे आपण आपले अस्तित्वच विसरत चाललो आहोत. खऱ्या अर्थाने युवकांनी एड्समुक्त महाराष्ट्र, भारत… स्वप्न नव्हे… ध्येय, हे वाक्य खरे ठरवायचे असेल तर वरील सर्व बाबींचा सारासार विचार करायला हवा.

“एकटे नाहीत तुम्ही – साथ आहोत आम्ही”

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. या कक्षांतर्गत विविध आयसीटीसी मार्फत युवकांसाठी एचआयव्ही, एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद, पोस्टर प्रदर्शन इत्यादी उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन वेगवेगळया लक्ष्यगटांमध्ये केले जाते.

यावर्षीचे जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य आहे “Take The Rights Path” मार्ग हक्काचा, सन्मानाचा ! हे आहे. म्हणजेच एचआयव्ही संसर्गित लाभार्थ्यांना पण सर्व सामान्य नागरिकांसारखे हक्क आहेत, ते वेगळे नाहीत. त्यांना समाजामध्ये सन्मानाची व आदराची वागणूक दिली पाहिजे. सर्व कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, नव्हे तो त्यांचा हक्क आहे. यासाठी भारत सरकारने हक्काची जोपासणा करण्यासाठी एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ अंमलात आणला आहे. ज्या कायद्याद्वारे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक प्रदान करण्यात आली आहे. जर कोणी कलंकित करत असेल किंवा भेदभाव करत असेल, तर कायद्याने त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. यावर्षीच्या घोषवाक्यानुसार एकटे नाहीत तुम्ही साथ आहोत आम्ही ही आम्हीपणाची भावना एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये विविध जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढीस लावणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

चला तर मग ०१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या सप्ताहामध्ये एड्स जनजागृती सप्ताह अभियानामध्ये आपण सारेजन सहभागी होऊ या… सामाजिक ऋण तसेच राष्ट्रीय कार्यास हातभार लाऊया… एचआयव्हीबद्दल अधिक विस्तृत माहितीसाठी १०९७ टोल फ्री क्रमांकावर आपण माहिती विचारु शकता किंवा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

सुहास मनोहरराव कुलकर्णी

(जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक)

 जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड

  मो.नं. ९४२००१७५३९

The post एड्स प्रतिबंधामध्ये युवकांची मोलाची भूमिका first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *