मुंबई दि.२४: भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते.
०००
The post राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर first appeared on महासंवाद.