छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका): श्रीमती शकुंतला मारुती अनवडे (वय ८६ वर्षे) कन्नड शहरातील शांतीनगर येथील रहिवासी. त्यांनी आज आपल्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात गृह मतदान नोंदविण्याचे काम सुरु आहे. मात्र शकुंतला आजींचे मतदान विशेष ठरले कारण त्यांचे मतदान नोंदविण्यासाठी स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी त्यांच्या घरी गेले होते.
भारत निवडणूक आयोगाने वय वर्षे ८५ व त्यापेक्षा अधिक वय असणारे वृद्ध व्यक्ति तसेच दिव्यांग व्यक्ति ज्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघांत गृहमतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.
गृह मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेतील गृह मतदानासाठी नियुक्त चमू मतदाराच्या घरी जाऊन मतदाराचे मतदान नोंदवून घेतात. त्यासाठी आवश्यक ती गोपनियता पाळली जाते. मतदाराला त्याचे मतदान नोंदविण्यासाठी त्यांच्या घरात पुरेशी गोपनीयता उपलब्ध करुन दिली जाते.
१०५-कन्नड मतदार संघात गृहभेटीद्वारे मतदानासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चमूत सहभागी झाले. त्यांनी श्रीमती शकुंतला मारुती अनवडे वय ८६ वर्षे यांचे मतदान नोंदविण्यासाठी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, १०५ कन्नडचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, गृह मतदान नोंदणी पथक क्रमांक १ चे अधिकारी संदीप महाजन, संदीप पाटील, श्रीमती अनिता जालनापुरकर, पोलीस कर्मचारी श्रीमती गिरी , सूक्ष्म निरीक्षक संजय देशपांडे यांच्यासह टपाली मतदान कक्षाचे योगेश मुळे व दिलीप मगर उपस्थित होते.
०००
The post शकुंतला आजींचे गृह मतदान नोंदविण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जातात तेव्हा… first appeared on महासंवाद.