जिल्हा माहिती कार्यालयाची संकल्पना
यवतमाळ, दि. १४ (जिमाका) : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. संपुर्ण राज्यात निवडणूक आयोगाच्यावतीने यासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने जनजागृतीसाठी तयार केलेल्या या चित्रफितीचे विमोचन आज जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्या हस्ते झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या विमोचन कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाल देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, चित्रफितीचे निर्माते आनंद कसंबे आदी उपस्थित होते.
लोकशाही मजबूत करण्यासोबतच प्रत्येकाच्या मनात मतदानाचे महत्व वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ही चित्रफित तयार करण्यात आली आहे. यवतमाळ येथील प्रसिद्ध माहितीपट निर्माते आनंद कसंबे यांनी प्रशासनासाठी विनामुल्य चित्रफितीची निर्मिती केली आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने अनेकजन मतदान करण्याऐवजी बाहेर फिरायला जातात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास अडचण निर्माण होते.
योग्य उमेदवार निवडण्यासोबतच प्रत्येक मतदाराचा लोकशाहीच्या उत्सवात सहभाग वाढविण्यासाठी ही चित्रफित महत्वाची ठरेल. ज्या प्रमाणे पक्षी घरटे बांधण्यासाठी एक एक काडी जमा करून घरटे तयार करते त्याचप्रमाणे एक एक मतदाराच्या मतदानाने लोकशाही समृध्द होत जाते, असा महत्वाचा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे. यावेळी उत्तम चित्रफित तयार केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आनंद कसंबे यांचे कौतूक केले. या लघुपटात महेंद्र गुल्हाने, वैष्णवी दिवटे आणि वेदांती बावणे यांनी भूमिका साकारल्या आहे.
०००
The post यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्रफितीचे प्रकाशन first appeared on महासंवाद.