नंदुरबार, दि. 24 (जिमाका वृत्त) : निष्पक्ष आणि निकोप वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या समन्वयातून निवडणूक खर्चावर देखरेखीचे व सनियंत्रणाचे काम केले जाते. हे काम करत असताना सर्वांनी सतर्कतेने व दक्षतेने काम करणे गरजेचे आहे. तसेच विविध ठिकाणी तपासणी व कारवाई करताना फलनिष्पत्तीवर भर द्यावा, अशा सूचना विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी नियुक्त खर्च निरिक्षक गौतम कुमार यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. गौतम कुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, खर्च विषयक नोडल अधिकारी प्रविण देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री अनय नावंदर (अक्कलकुवा), सुभाष दळवी (शहादा), श्रीमती अंजली शर्मा (नंदुरबार), महेश चौधरी (नवापूर), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल गावडे, उपवनसरंक्षक संतोष सस्ते, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक सचिन गांगुर्डे, रेल्वे स्थानकचे अधिक्षक संजीव रंजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील खर्च विषयक कामकाजावर देखरेख करणारे नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गौतम कुमार म्हणाले, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील आंतरजिल्हा सिमांवर अत्यंत सतर्कतेने यंत्रणांनी काम करणे गरजेचे आहे. विशेषतः प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निगराणी साठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने नोंदी घेताना व्हिडिओ शुटींग करावी. तसेच आंतरराज्य सिमांवर तैनात सनियंत्रण पथकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्याही पथकाच्या माध्यमातून अथवा कुठल्याही चेकपोस्टवर कारवाई करताना अथवा तपासणी तसेच कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे फलनिष्पत्तीवर भर देण्यात यावा. निवडणूकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अर्थविषयक बाबींवर अत्यंत सुक्ष्मपणे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वाहनांची तपासणी अधिक दक्षतापूर्वक करावी. पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे. रेल्वे व परिवहन विभागाने परराज्यातून व शेजारील जिल्ह्यामधून होणाऱ्या प्रवासी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे.
यावेळी श्री. गौतम यांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय सुरू असलेले. निवडणूक कामकाजाची माहिती घेतली. त्या अनुषंगाने विधानसभा मतदार संघनिहाय सर्वश्री अनय नावंदर (अक्कलकुवा), सुभाष दळवी (शहादा), श्रीमती अंजली शर्मा (नंदुरबार), महेश चौधरी (नवापूर) यांनी सादरीकरण केले.
यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ, खर्च विषयक नोडल अधिकारी प्रविण देवरे यांनी सहभाग घेतला. यावेळी पोलीस अधिक्षक, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लिड बँक मॅनेजर, आयकर अधिकारी, उप आयुक्त, राज्य वस्तू व सेवा कर, जिल्हा वन अधिकारी या विभागामार्फत निवडणूक खर्च देखरेखीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
The post निवडणूक खर्चावर नियंत्रणासाठी दक्ष रहावे; कुठल्याही कारवाईत फलनिष्पत्ती अपेक्षित – निवडणूक खर्च निरीक्षक गौतम कुमार first appeared on महासंवाद.