नागपूर महानगरालगतच्या ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधा भक्कम करु –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. 12 : नागपूर महानगरासह लगतच्या ग्रामीण भागामध्ये गत दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या झाल्या. यासाठी पायाभूत सुविधा नव्याने निर्माण करणे आवश्यक होते. रस्ते आवश्यक होते. नवीन विकसित झालेल्या अधिवास क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा  देणे गरजेचे होते. मी मुख्यमंत्री असताना सर्वात अगोदर प्राधान्याने येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. इतर पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आपण एनएमआरडीएच्या माध्यमातून परिपूर्ण नियोजन केले. नरसाळा हुडकेश्वर या भागातील जनतेसाठी तेव्हा दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनामुळे विकासकामांना आता नियोजनबद्ध गती देता आल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अमृत-2 योजना अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रातील 25 गावांसाठी 716 कोटी 90 लाख रुपयांचा  महत्वाकांक्षी गटरलाईन व मलनि:सारण प्रकल्प आणि हुडकेश्वर नरसाळा भागातील 115 कोटी 46 लाख रुपयांच्या मल नि:सारण प्रकल्पाच्या भूमिपूजन सभारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, माजी आमदार सुधाकर कोहळे,  मल्लिकाजून रेड्डी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर उपस्थित होते.

नगर पंचायत बेसा, पिपळा, बहादुरा, बिडगाव , हुडकेश्वर, नरसाळा यासह परिसरातील लहान गावांसाठी गटरलाईन व मल नि:सारण प्रकल्प हे आवश्यक होते. मल नि:सारण प्रकल्पामुळे पर्यावरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय  स्वच्छतेमुळे आरोग्य व इतर प्रश्न सुटणार आहेत. आपल्या भागातून जाणारी पोहरा नदी ही प्रकल्प नसल्याने नाल्यात रुपांतरित झाली आहे. या नदीलाही आता प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्वच्छतेचे रुप प्राप्त होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी आमदार  चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी पुढाकार व पाठपुरावा केल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

वास्तविक या व इतर प्रकल्पासाठी मधल्या काळात कसलाही निधी मिळाला नाही. याची कमतरता आपले शासन आल्यानंतर आपण आता भरुन काढत कामांना गती दिली आहे. या प्रकल्पांना निधीही उपलब्ध करुन दिला आहे असे ते म्हणाले.

आपल्या योजना या परिवर्तनाचे प्रतिक झाल्या आहेत. आपण लाडक्या बहीणींसाठी योजना आणली. लेक लाडकी सारखी योजना आणली. यात एक लाख रुपयांपर्यतची मदत आपण मुलींना देतो. उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के फीस शासनामार्फत आपण देत आहोत. याच्या जोडीला आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीची योजना दिली आहे. आजच्या घडीला 11 लाख लखपती दिदी तयार झाल्या असून आपण एक कोटी लखपती दिदी तयार करणार आहोत. यात नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त लखपती दिदी तयार करु असे ते म्हणाले. सर्वसामान्य समाजातील घटकाला, माणसांना केंद्रस्थानी ठेवून आपण योजना आखल्याचे त्यांनी सांगितले.

आपले सरकार सर्वांसाठी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी आपण वीज बिल माफी दिली आहे. याच्या जोडीला जवळपास 14 हजार मेगावॅट विजेची उपलब्धता सौर ऊर्जेच्या माध्यमातून करीत आहोत. कोणत्याही स्थितीत दररोज  बारा तास वीज शेतकऱ्यांना आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले. ही दिवसाचे बारा तास वीज असेल. सौर तंत्रज्ञानामुळे  ही वीज आठ रुपयांऐवजी तीन रुपये प्रती युनीट शासनाला पडत आहे. शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देत आहोत. शिवाय सरकारचे आपण यातून 10 हजार कोटी रुपये वाचवित असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे हे मॉडेल इतर राज्यांनी अंगिकारावे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यांना सांगितल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांनी  विविध विकास कामांचा आढावा मांडला. बेसा येथील भूमिपूजन समारंभाचे प्रास्ताविक नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती संजय मीना यांनी तर नरसाळा येथील आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

The post नागपूर महानगरालगतच्या ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधा भक्कम करु –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *