लातूर, दि. ११ : बाराव्या शतकात सामाजिक समतेचा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सर्व समाज घटकांना सोबत घेवून विकास कामे राबविण्यावर आपला भर असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. जळकोट येथे महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी आमदार गोविंद केंद्रे, नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, तहसीलदार राजेश लांडगे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. कोरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण यांच्यासह हावगीस्वामी मठाचे डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, बस्वलिंग शिवाचार्य महाराज आदी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वरांचे विचार युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. जळकोट येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यामुळे सर्वांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल. उदगीर, जळकोट तालुक्यात विविध विकास कामे राबविताना आपण सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जळकोट येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला एकाच दिवशी निधी मंजूर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी बस स्थानक परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये दळणवळण, सिंचन, वीज, आरोग्य सुविधांची निर्मिती करून येथील नागरिकांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी मंजूर करून घेतली आहे. याठिकाणी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उदगीर येथे भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ उभारणीचे आपले ध्येय असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये लाभ देण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात ही रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल. यासोबतच युवकांना दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचाही निर्णय शासनाने घेतला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.
जळकोट, उदगीर तालुक्यात झालेल्या पायाभूत सुविधा निर्मितीमुळे दोन्ही तालुक्यांचा चेहरा-मोहरा बदलला असल्याचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी सांगितले. तर जळकोट नगरपंचायत इमारत, शहरातील रस्ते व विविध विकास कामांना ना. बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे यांनी आभार मानले.
डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज आणि विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
०००००
The post जळकोट येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण first appeared on महासंवाद.