चांगले शिक्षण, संस्काराद्वारे देश घडविण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांना भरीव निधी देवून शाळा सुंदर व अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पटसंख्या वाढत असून ही समाधानाची बाब आहे. चांगले शिक्षण व संस्कार देवून देश घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा सन 2023-24 बक्षीस वितरण व जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 च्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, विश्वास चितळे, राजेंद्र नागरगोजे, विनायक शिंदे, वैभव नलवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गत दोन अडीच वर्षात भरीव निधी दिल्यामुळे शाळा सुंदर व सुसज्ज बनू लागल्या आहेत. त्यामुळे लोकांची जिल्हा परिषद शाळेबाबतची मानसिकता बदलून या शाळांच्या पटसंख्येत वाढ होवू लागली आहे. शाळांना, शिक्षकांना अधिक चालना मिळण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर म्हणाल्या, शिक्षक हा समाज घडवत असतो. शिक्षकांनी चांगली मुले घडविण्याबरोबरच स्त्री सुरक्षितता, स्त्री पुरूष समानता, महिला अत्याचार यावरही लक्ष देवून चांगला समाज घडविण्यासाठी विशेष योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात विभाग स्तरावर प्रथम व राज्यस्तरावर तृतीय क्रमांक आलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद ढालेवाडी शाळेचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांक प्राप्त शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते व रूपाली माळी यांनी केले. कार्यक्रमास सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षक, शिक्षिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

The post चांगले शिक्षण, संस्काराद्वारे देश घडविण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *