मराठी व्यावसायिक बाल नाटकांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 : राज्याचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करून मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे महत्वपूर्ण कार्य रंगकर्मी, कलाकार करीत असतात. अनेक दिग्गज कलाकारांच्या कलाआयुष्याला त्यांच्या बालपणीच सुरूवात झालली असते. बाल नाटकांचे महत्व लक्षात घेता राज्यातील बाल नाटकांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने 62 वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा नाट्य गौरव सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, दादर येथे झाला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे,  सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, अवर सचिव बाळासाहेब सावंत उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करीत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघ एखाद्या देशाची प्रगती पाहण्यासाठी जीडीपी, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आदी निकष लावत. मात्र आता एखादा देश आर्थिक सक्षमतेपेक्षा आनंदी किती हे पाहण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हॅपीनेक्स इंडेक्सचा निकष लावला आहे. हा इंडेक्स वाढविण्याची ताकद केवळ कलावंतांमध्येच आहे. असे गौरवोद्गारही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी काढले.

राज्यनाट्य स्पर्धेतील परीक्षकांचे मानधन प्रती नाटक 900 रूपये करण्यात आले असल्याचे सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, व्यावसायिक नाटक परीक्षकांचे मानधनही दुप्पट करण्यात आले आहे. मराठी व्यावसायिक बाल नाटकांच्या सर्वंकष अभ्यासासाठी शासनाने ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या केंद्रामध्ये 19 वरून 24 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शासनाने या सांस्कृतिक वारशाची उर्जा अशीच कायम ठेवण्यासाठी विविध निर्णय घेतले आहे. यामध्ये विविध पुरस्कारांची रक्कम दुप्पट करून ती पुरस्काराला साजेशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ७५ नाट्यगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी 6 नाट्यगृहांना मान्यताही देण्यात आली आहे. नाटक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहाच्या भाड्याची मोठी अडचण येते. यासाठी नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये सूट देण्याबाबत शासन विचार करीत आहे. नागपूरमध्ये भाड्यामध्ये सूट देण्यास मान्यताही देण्यात आली आहे.

यावेळी अप्पर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे आपल्या मायबोली मराठी भाषेचे संवर्धन व भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी वाढली आहे. नाटक हे मराठी संवर्धनाचे काम प्रभावीपणे करीत आहे. ही पंरपरा अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धा महत्वाची भूमिका निभावत आहे.  यावेळी नाट्यनिर्मिती क्षेत्रातील विविध पारितोषिक सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एकूण 189 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला नाट्य, कला क्षेत्रातील कलावंत, दिग्दर्शक, अभिनेते, पुरस्कारार्थी उपस्थित होते.

विविध पारितोषिकांचे वितरण

यावेळी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, हिंदी, संस्कृत, संगीत नाट्य, हौशी, व्यावसायिक या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय, संगीत नाट्य स्पर्धा उत्कृष्ट गायन, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, संगीत दिग्दर्शन, नाट्यलेखन, दिग्दर्शन, नाट्यनिर्मितीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले.

*****

निलेश तायडे/विसंअ/

The post मराठी व्यावसायिक बाल नाटकांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *