अमरावती, दि. 7 : इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील, खासदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कापसापासून ते तयार कपड्यापर्यंत साखळी निर्माण करण्यात येत आहे. बाजारपेठेतील विविध फॅशन्सप्रमाणे रेशीम वस्त्रांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कापसा पेक्षा जास्त उत्पन्न रेशीममधून मिळत आहे. रेशीमला असलेली मागणी आपण अद्यापही पूर्ण करू शकलो नसल्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. रेशीम शेती वाढल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेशीम खरेदीची व्यवस्था करण्यात येईल. याच धर्तीवर सोलापूर येथे केंद्र निर्माण करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, पाणी, खते, मार्गदर्शन आणि उत्पादीत मालाला भाव मिळाल्यास शेतकरी स्वयंपूर्ण होईल. त्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकरीही रेशीम शेती करू शकतो. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
000000
The post शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील first appeared on महासंवाद.