बारामती, दि.७: शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य प्रकारे भाव मिळण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचे होणारे नुकसान टाळण्याकरीता कृषी विषयक संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
कृषी विकास ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र माळेगाव येथे ‘रोटरी क्लब’च्यावतीने आयोजित ‘ग्रीन गोल्ड’ दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबीरास पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील शेतकरी तसेच रोटरीच्या प्रकल्प संचालक मनीषा कोंडसकर, विभागीय व्यवस्थापक रश्मी कुलकर्णी, प्रतीक्षा माई, वृषाली खिरे, डॉ. संजीव जैन, डॉ. सुनीता जैन आदी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतकरी कल्याणाच्या वीज देयकात माफी, महिलांना कृषी विषयक बाजारपेठेत स्थान मिळण्याकरीता लखपती दीदी योजना आदी योजना राबविण्यात येत आहे. त्याकरीता पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कृषी विभाग, ॲग्रोवन, कृषी विषयावर काम करणाऱ्या संघटनेच्यामार्फत या योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी आठवडी बाजारामुळे शेतकरी ग्राहकाला थेट शेतमाल विक्री करता येते. शेतकरी आठवडी बाजारापेठेत पूर्व मागणी (प्री-आर्डर) घेण्याबाबत विचार करण्यात यावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कृषी विषयक कामाबाबत केंद्र सरकारच्यावतीने पुरस्कार प्रदान केला आहे. कृषी विषयक प्रकल्प, संशोधन, कृषी उद्योग तसेच बियाणे, खते, औषधामधील भेसळ आदीबाबत जनजागृती करण्याकरीता प्रशिक्षाणार्थी आणि शेतकऱ्यांचे मंच, व्यासपीठ निर्माण झाले पाहिजेत, कृषी पर्यटन क्षेत्रातही काम करावे. उत्पादक शेतकरी आणि पुरवठादार यांचा समन्वय, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याकरीता पुढाकार घेण्यात यावा.
कृषी विद्यापीठामार्फत सेंद्रीय शेतीवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर द्यावा. पशु आरोग्य महत्त्वाचे असून याबाबत शेतकऱ्यांसाठी शास्त्रशुद्ध दृष्टीकोनाचे व्याख्यान आयोजित करावे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात यावी, कृषी वाचनालये स्थापन करण्याबाबत पुढाकार घ्यावा. या बाबींचा कृषी क्षेत्राला लाभ होण्यास मदत होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
शाश्वत विकासाच्या उदिष्टपूर्तीकरीता काम करावे
तापमान, अतिवृष्टी, निसर्गाचे बदलणारे चक्र यासारख्या बाबींचा कृषी घटकावर परिणाम होतो. त्यामुळे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपैकी शेतकऱ्यांशी निगडित १७ उदि्दष्टांविषयी व्याख्यात्यांनी या शिबीरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. आगामी काळात शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीकरीता काम करावे, कृषी विभागाच्यावतीने राज्यात क्षेत्रनिहाय पीकपद्धती घेण्याबाबत नियोजन केले असून त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या भागाचा विचार करुन पिके घ्यावीत, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कृषी विज्ञान केंद्रात करण्यात येणारे विविध संशोधन, प्रकल्प, कलमे, रोपे, प्रशिक्षण, अन्न प्रकिया केंद्र आदीबाबत माहिती जाणून घेतली.
श्रीमती कोंडुसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
0000
The post कृषी विषयक संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे first appeared on महासंवाद.