“अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान” – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 4 : मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषा जाहीर झाल्यामुळे सन्मानप्राप्त झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक तसेच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान प्रत्येकाला सुखावणारा आहे.

माय मराठीला बहुप्रतिक्षित अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी माननीय प्रधानमंत्री यांचा आभारी आहे. पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, अधिकाधिक लोक, विशेषत: युवक आणि लहान मुले मराठी भाषा शिकतील, बोलतील व या भाषेत लिहितील तसेच मराठी भाषा विश्र्वभाषा करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास यांनी व्यक्त केला. या आनंदाच्या प्रसंगी राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेचे आणि जगभरातील मराठी भाषिकांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्यावतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे आणि विशेषतः प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे  या निर्णयाबद्दल राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आभार मानल्याचे संदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *