राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विकास विषयक प्रश्नांवर विविध समाज घटकांशी संवाद

अमरावती दि. ३: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य क्षेत्रासह विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

यावेळी आमदार प्रवीण पोटे -पाटील, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पद्‌मश्री प्रभाकर वैद्य, साहित्यिक वसंत आबाजी डाहाके, मेळघाटातील डॉ. रवींद्र कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बाराहाते, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, विभागीय मुख्य वन संरक्षक जयोती बॅनर्जी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर मान्यवर व्यक्तींनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचन अनुशेष, विदर्भातील प्रशासकीय अधिकारी यांचा अनुशेष, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा. ‘उद्योगांसाठी पोषक वातावरण ‘नागरी सेवा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण यासारखे विषय मांडले. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

मेळघाटात  पुरेशा प्रमाणात पाऊस पडतो. परंतु, पावसाचे पाणी थांबविण्यासाठी जल संधारणाची कामे करण्यात यावी. बांध आणि इतर कामे करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प निर्माण करण्यात यावा.  टेक्सटाईल पार्कमधील उद्योजकांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करीत आहे. त्यासोबतच कामगारांच्या संघटनांही  सहकार्य करणे आवश्यक आहे. यामुळे उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण तयार होईल. याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. पोलिस प्रशासनानेही याबाबत तक्रार आल्यास योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. याबाबत राजकीय पक्षांशीही चर्चा करण्यात यावी. यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

खेळाडूंनी खेळामध्ये जास्त लक्ष द्यावे लागत असल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे शक्य होत नसल्याने अल्प प्रक्रियेत शासकीय नोकरी मिळण्याची प्रक्रिया करण्यात यावी. अशी अपेक्षा खेळाडूंनी व्यक्त केली. याबाबत राज्यपालांना शासनाच्या ध्येय धोरणानुसार याबाबत कार्यवाही होईल, असे आश्वस्त केले.

अमरावती येथे तिरंदाजी खेळामध्ये उत्तम पायाभूत सुविधा आहेत. येथे या क्रीडा प्रकारबाबत आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण होवू शकतील. यासाठी उत्तम प्रशिक्षक तसेच क्रीडा साहित्य मिळावे. तसेच उत्तम प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावे यासाठी नागरी प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रभाकर वैद्य यांच्या यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत जिल्ह्याच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थिती व उद्योग व जिल्हा विकास आराखड्यानुसार विकासाचे नियोजनाचे सादरीकरण केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *