मराठवाड्याची सर्वक्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा उत्साहात

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ : कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात केले.

येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी, मानवंदना नंतर ध्वजारोहण करण्यात आले.

हुतात्म्यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण

ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात सुरुवातीला त्यांनी मुक्ति लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले  की, मुक्तिसंग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अजरामर केला आहे. भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुध्द पोलीस कारवाई सुरु केली. पोलीस कारवाई सुरु होताच काही दिवसातच भारतीय सेनेने हैद्राबाद संस्थानावर ताबा मिळविला आणि लढ्याला यश प्राप्त झाले.

स्मृतीस्मारकासाठी १०० कोटींचा निधी

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याची स्मृती जपण्यासाठी गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे स्मृती स्मारक उभारण्यासाठी १००कोटी रुपये निधी दिला आहे. तसेच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन निधीतून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले. गेल्या सव्वादोन वर्षांपासून मराठवाड्याच्या विकासासाठी  शासनाने ठोस पाऊले उचलली आहेत.  गेल्या वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची धडाकेबाज अंमलबजावणी सुरु केली आहे. मराठवाड्यातला दुष्काळ हटविण्यासाठी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात  वळविण्याकरिता सुमारे १५ हजार कोटीं रुपयांच्या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार होतोय. त्यात प्रामुख्याने दमणगंगा (एकदरे) गोदावरी (वाघाड) नदीजोड योजना आणि दमणगंगा वैतरणा – गोदावरी (कडवा देव नदी) नदीजोड योजना, पार गोदावरी नदीजोड योजना  या योजनांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर  शहरासाठी सर्वात महत्त्वाच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम सुद्धा आहे. मराठवाड्यात ४ लाख विहिरीची कामे सुरु आहेत. बीड जिल्ह्यातील श्री पांचाळेश्वर, पोहिचा देव, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव आणि देवस्थानांच्या विकासासाठी २७५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रस्त्यांची  कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर आहे. नाबार्डच्या  मदतीनं  रस्त्यांची ४४ कामे होत आहेत. हायब्रिड अॅन्यूईटी योजनेतून १०३० कि. मी. लांबीचे रस्ते सुधारताहेत. मराठवाड्यातल्या ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यालयांसाठी बांधकामे सुरु आहेत. त्यांना भारतनेटद्वारे जोडले जात आहे. मराठवाड्यातल्या शहरांमध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधांची कामं जोरात सुरु होत आहेत. आवश्यक त्या सगळ्या मान्यता दिल्या आहेत.  ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतुद केली त्याचा मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ होतोय. मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी आठही जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-१  हा २०२७ पर्यंत राबवला जाईल. त्यासाठी एनडीडीबी आणि मदर डेअरी सहकार्य करणार असून त्यात विदर्भातीलही काही जिल्हे आहेत. या प्रकल्पासाठी १४९ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना ५ हजार कोटींचे अनुदान मंजूर केलं आहे.मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय झाला असून त्याचा लाभ  लाखो नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक गुंतवणुकीतून विकास

शेंद्रा येथील ऑरिक सिटीत २० हजार कोटींची गुंतवणूक असलेला किर्लोस्कर-टोयोटाचा इलेक्ट्रिक- हायब्रीड कार प्रकल्प येतोय. बिडकीनमध्ये १०० एकर जागेवर २ हजार कोटींची गुंतवणूक असलेला एथर एनर्जी कंपनीचा ईव्ही प्रकल्प येतोय. उद्योगांचा विकास व्हावा यासाठी मराठवाड्यातल्या उद्योगांना विद्युत शुल्क माफीच्या कालावधीस मार्च २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढविली. मराठवाड्यातल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मराठवाड्यात २५ हजारपेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरात अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच तिथेही काम सुरु होईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे भगिनींना लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ कोटी ६० हजार भगिनींच्या खात्यात दोन हप्ते जमा झाले आहेत. सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. मराठवाड्यातल्या भगिनींना सुद्धा याचा मोठा लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आर्थिक दुर्बल कुटुंबाला वर्षातून तीन वेळा गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असून त्याचाही फायदा मराठवाड्यातल्या गरीब महिलांना होणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी सुद्धा मराठवाड्यातल्या हजारो ज्येष्ठांनी नोंदणी केली आहे. मुलीसाठी मोफत शिक्षण या निर्णयाचा फायदाही मराठवाड्यातील मुलींना मिळतो आहे.

दळणवळण सुविधांचा विकास

जालना मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हा भाग आर्थिक राजधानीशी जोडला गेला आहे. जालना ते जळगाव या १७४ किमीच्या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली आहे. त्यामुळे जालना, सिल्लोड यांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या किनारी भागातील कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.त्यामुळे येथील विकासाला देखील चालना मिळणार आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.संतांचा संस्कार, मेहनती युवक, शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक,संकटांवर मात करणारा शेतकरी, वाढणारे उद्योग हे सगळं या भूमीचं वैशिष्ट्य आहे. या मराठवाड्याची सर्व क्षेत्रात कालबद्ध प्रगती, हेच शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

या सोहळ्यास विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सर्वश्री डॉ.भागवत कराड, संदिपान भुमरे, कल्याण काळे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबिय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव तरतूद

छत्रपती संभाजी नगर – गोदावरी काठावरच्या २०० देवस्थानांना जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग – २३४ कोटींची तरतूद
जालना येथे रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार- २५ कोटी.
परभणी- गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजूरी दिलीय. त्यासाठी ५० कोटी.
नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगड हे शक्तीपीठ. याठिकाणच्या सुधारीत विकास आराखड्यास मान्यता दिलीय. नव्याने करावयाच्या व अत्यावश्यक कामांसाठी ८२९ कोटी १३ लाखांची मंजूरी.
हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी १४ लाख.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आयटीआयमधील अल्पसंख्याक तुकड्यांसाठी नवीन कार्यशाळा बांधण्यासाठी १५ कोटी
धाराशिव मधील सोनारी भैरवनाथ देवस्थान, परांडा येथील विकास आराखड्यासाठी १८६ कोटींना मंजूरी.
लातूर जिल्ह्यातील मौजे धनेगाव व मौजे चाकूर येथील मुलींची शासकीय निवासी शाळांसाठी ५० कोटी.

एकूण १४३४ कोटी रुपयांची विकासकामे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खालील कामांचे

भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले

१.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या डीज़ीटल डोम थिएटरपुनेटेरीयम (तारांगण) – लोकार्पण

२. प्री फॅब्रिकेटेड एसटीपी प्रकल्प लोकार्पण

३.  हरित कचऱ्यावर (गार्डन/ग्रीन वेस्ट) वर प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण

४. पश्चिम विधानसभा मतदार संघ NO NETWORK भागात जलनिःसारण वाहिनी चे भूमीपूजन

५.  एन-१२ सिडको येथे विशेष मुलांसाठी शाळा, उपचार व संशोधन केंद्राचे भूमीपूजन

६. शहरात विविध चौकामध्ये १४ स्मार्ट सिग्नल उभारण्याचे भूमीपूजन

७. शहरातील स्मशानभूमीचा सर्वांगिण विकासकामाचे भूमीपूजन

८. १२ कोटी अंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण – भूमीपूजन

९. स्मार्ट सिटी अंतर्गत PM-e (इलेक्ट्रीकल बस) सेवा डेपो इमारतीचे भूमीपूजन

१०. मालमत्ता कर विभागामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाधारीत मालमत्ता कर नियंत्रणकक्षाचे लोकार्पण

११.  दिव्यांगक्षरे चालविण्यात येणा-या सक्षम पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे लोकार्पण

१२. मिटमिटा मनपा शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन

१३. नवीन खरेदी करण्यात आलेल्या जेटींग मशीन, व्हॅक्यूम मशीन,स्वीपींग मशीनचे लोकार्पण

१४. स्मार्ट डिजीटल बस सेवा उपलब्ध करण्याच्या हेतूने एकात्मिक वाहतुक व्यवस्थापनसंचालन प्रकल्पाचे लोकार्पण

१५. झोन क्र. ४ मनपा प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण

१६. मनपा शाळा शास्त्रीनगर, गारखेडा येथे सिंथेटिक टर्फचा लोकार्पण.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *