राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कल्याणकारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या ‘शाश्वत विकास संमेलन’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत

मुंबई, दि. ६ : गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ सारख्या अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हॉटेल आयटिसी येथे टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्यावतीने आयोजित ‘शाश्वत विकास संमेलन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उमेश कुमावत आणि निखिला म्हात्रे यांनी मुलाखत घेतली, यावेळी ते बोलत होते. यावेळी टिव्ही ९ मराठीचे व्यवस्थापकीय संचालक वरूण दास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी यंदाच्या वर्षी ३३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १ कोटी ६९ लाख बहिणीच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ करण्यात येईल. ही योजना बंद होणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पामुळे वाहतूक जलद झाली असून वेळ व इंधन वाचण्यास मदत होत आहे. लवकरच मेट्रो 3 सुरू होणार असून यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून लाखो लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले की, विकास प्रकल्पांना चालना देतानाच दुसरीकडे आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री  लेक लाडकी व लखपती दिदी अशा योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करून या योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण व ज्येष्ठ अशा सर्व घटकांचा विचार हे शासन करत आहे. या सर्व योजनासाठी निधीची तरतूद करून ठेवण्यात आली आहे.

मराठा समाजाला ओबीसीला देण्यात येणाऱ्या  विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासन अनेक लोकोपयोगी व कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, त्यासाठी माध्यमांनीही सहकार्य करावे. तसेच बातम्या देताना माध्यमांनी दोन्ही बाजू जाणून घेऊन वस्तुनिष्ठ माहिती लोकांपुढे मांडावी.

०००

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *