आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले ‘आरोग्य दूत’
मुंबई, दि. ०४: “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी – वर्ष २ रे” या उपक्रमात पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठी नवा इतिहास रचला आहे. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. या उपक्रमात १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी पार पाडताना आरोग्य विभाग व आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत हे खऱ्या अर्थाने वारकऱ्यांसाठी आरोग्यदूत ठरले आहेत.
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमामुळे पंढरपूरच्या वारीला एक नवी ओळख मिळाली आहे. त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे, ज्यामुळे अनेक वारकऱ्यांचे जीव वाचले आणि लाखो वारकऱ्यांना तत्काळ उपचार मिळाले. वारी दरम्यान आणि पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिरात वेळेवर आणि सहज, दर्जेदार उपचार मिळाल्यामुळे वारकऱ्यांनी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांचे आभार व्यक्त केले आहे.
पंढरपुरातील महाआरोग्य शिबिर ठरले जगातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर
जगातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दलची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली आहे. या महाआरोग्य शिबिरात १५,१२,७७४ लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आणि त्यासाठी ७,५०० डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पालखी मार्ग आणि पंढरपुरातील महाआरोग्य शिबिरात १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातून या दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी बजावली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.
देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातील पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी दि. १४ ते १८ जुलै २०२४ या कालावधीत पंढरपुरातील वाखरी, गोपाळपुर, तीन रस्ता, ६५ एकर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना आणि भाविकांना विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या.
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार करून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली. पालखी मार्गावर गर्दी असल्याने मोठी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय १०२ व १०८ या अॅम्बुलन्सनेही पालखी मार्गावर सेवा दिली. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली होती. डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी वारीमध्ये सेवा दिली.
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. वारकरी आणि भाविकांमध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने उपक्रम राबविण्यात आले. यात आरोग्य दिंडी, चित्ररथ, आरोग्य दूत, संदेश टोपी, आरोग्य प्रदर्शनी, बॅनर्स/ स्टिकर्स, आरोग्य संदेश ऑडिओ व्हिडिओ, समाज माध्यमे, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे संदेश प्रसारण, वृत्तपत्र जाहिरात, क्यूआर कोडचे वाटप, आरोग्य ज्ञानेश्वरी यांचा समावेश होता.
००००
निलेश तायडे/विसंअ