उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिन्नरमधील शासकीय इमारतींचे लोकार्पण

नाशिक, दि. १० (जिमाका):  सिन्नर तालुक्यातील सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय यासोबतच सिन्नर व एमआयडीसी पोलीस ठाणे अशा चार इमारतींचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय लोकार्पण

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी फित कापून तसेच कोनशीलेचे अनावरण करुन केले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी  हेमांगी पाटील, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता पी.आर.भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय हे 1 मे 2020 पासून कार्यरत असून कोरोना साथरोगाच्या काळात येथे रूग्णांसाठी 200 खाटांची व्यवस्था करून अविरत सेवा देण्यात आली होती. एप्रिल 2022 नंतर या रूग्णालयात इतर सेवाही कार्यान्वित करण्यात आल्या. येथे 30 खाटांचे ग्रामीण रूग्णालय सुद्धा कार्यरत असून 3 वैद्यकीय विशेतज्ञ अधिकारी नियुक्त केलेले आहेत. याठिकाणीच मुत्रपिंड आजाराच्या रूग्णांसाठी 5 खाटांचे डायलेसिसची सुविधा देणारे केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तहसिल कार्यालय प्रशासकीय इमारत लोकार्पण

तहसिल कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आमदार माणिकराव कोकाटे जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, सहाय्यक अभियंता पी.आर.भोसले, निवासी नायब तहसिलदार सागर मुंदडा उपस्थित होते.

पोलीस ठाणे एमआयडीसी व पोलीस ठाणे इमारतीचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील 4 कोटी 42 लाख निधीतून साकारलेले पोलीस ठाणे एमआयडीसी सिन्नर व सिन्नर पोलीस ठाणे या दोन्ही इमारतींचे लोकार्पण पार पडले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आमदार माणिकराव कोकाटे, पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक यशवंत बावीस्कर व संभाजी गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *