‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आर्थिक स्वावलंबनाची क्रांती – मंत्री आदिती तटकरे

महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हदगाव व भोकर येथे मेळावे
 राज्यात १.४० कोटी अर्ज ; सव्वा कोटी अर्ज पात्र

नांदेड दि. : अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे. स्वतःचे बँक खाते, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे या स्वावलंबित्वामुळे, सक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. रक्षाबंधनापूर्वी 16 व 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, याची शाश्वती दिली. राज्यामध्ये 1 कोटी 40 लक्ष अर्ज आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सव्वा कोटी अर्ज पात्र ठरले आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला पैसे जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या योजनेचा पहिला टप्पा 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होईल. मात्र त्यानंतर ही योजना निरंतर सुरू असेल. अर्ज उशीरा दाखल झाला तरीही जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील.

या योजनेसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे कोणतेही प्रश्न बाकी राहणार नाही यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने पहिल्यांदाच अशासकीय कर्मचारी असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला आहे. याशिवाय प्रत्येक अंगणवाडी सेविकेला देखील आपला अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकेने प्रथम स्वतःचा अर्ज दाखल करावा व इतर महिलांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्य शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर लाडक्या भावासाठी सुद्धा योजना आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये या ठिकाणी जमलेल्या तमाम युवकांनी सहभागी व्हावे. सहा महिन्याच्या प्रशिक्षणाची व अर्थार्जनाची तरतूद असणारी ही योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना, बाल संगोपन योजना, अशा अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नांदेड विमानतळावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, महिला व बालकल्याण अधिकारी रेखा कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या बालिका पंचायत उपक्रमातील बालिका सरपंचांशी त्यांनी चर्चा करून या उपक्रमाची माहिती जाणून घेतली घेतली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *