हिरकणी कक्ष, दामिनी पथकासाठी ई-बाईक्सचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली, दि. १० (जि. मा. का.) : महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्थापित हिरकणी कक्ष तसेच, पोलीस दलास भेटस्वरूपात प्राप्त दामिनी पथकाच्या 6 ई – बाईक्स यांचे लोकार्पण आज येथे करण्यात आले.

पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डीपीसीतून 20 ठिकाणी हिरकणी कक्ष

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सांगली जिल्ह्यात 20 ठिकाणी बंदिस्त हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. यासाठी 3 टक्के राखीव निधीतून 2 कोटी 12 लाख 18 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, सांगली शहर पोलीस ठाणे, मिरज शहर पोलीस ठाणे, जत, तासगाव, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, ईश्वरपूर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे 11 हिरकणी कक्ष तर परिवहन विभागाच्या माध्यमातून जत, ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेपूर, कडेगाव, खानापूर आणि पलूस येथे 9 हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याचे प्रातिनिधीक लोकार्पण यावेळी करण्यात आले.

शासकीय कार्यालयात कामासाठी येणाऱ्या गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना सुरक्षित वातावरणात स्तनपान करता यावे, महिलांना विश्रांती घेता यावी आणि किशोरवयीन मुलींना नैसर्गिक ऋतुचक्राच्या काळात सुरक्षित व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा हिरकणी कक्षांचा प्रमुख उद्देश आहे.

महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक अधिक सक्षम

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागामार्फत कार्यरत असलेल्या दामिनी पथकाला 6 ई-बाईक भेट स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेशी संबंधित तक्रारींवर तसेच गर्दीच्या, बाजारपेठेच्या व संवेदनशील भागांमध्ये दामिनी पथकाला अधिक वेगाने पोहोचता येणार आहे. दामिनी पथकासाठी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, मिरजचे डॉ. विनोद परमशेटटी, उषःकाल हॉस्पिटलचे सचिव डॉ. मिलिंद पारेख, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी ई बाइक प्रायोजित केल्या. सिद्धी शो रूमचे श्रीकांत तारळेकर यांच्याकडून प्रत्येक बाईकमागे 15 हजार रुपयेची सवलत मिळाली व तसेच, सहा हेल्मेट त्यांनी भेट दिले आहेत. त्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सर्व प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *