हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग; महाराष्ट्राची भाग्यरेषा 

विशेष लेख

राज्याची प्रगती अधिक गतिमान करण्यात दळणवळण सुविधांची व्यापक उभारणी महत्त्वाची बाब आहे. त्याला प्राधान्य देत शासन नागरिकांच्या प्रवास सुविधेच्या दृष्टीने  अनेक प्रकल्प  गतीने पूर्ण करत आहे. यामध्ये  सर्वात महत्त्वाचा ठरलेला 701 कि.मी लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी  महामार्ग आता अंतिम टप्प्यासह पूर्णपण सुरु होत आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. दुसऱ्या टप्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकुण 80 कि.मी लांबीचे लोकार्पण दि. 26 मे 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंतच्या 25 किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दि. 4 मार्च 2024 रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते.  एकूण 701 कि.मी पैकी 625 कि.मी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरु असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी  वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. आता, समृद्धी महामार्गाची उर्वरित 76 कि. मी लांबीचे (इगतपुरी ते आमणे) लोकार्पण दि. 05 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

प्रकल्पाची व्याप्ती

राज्याच्या पाच महसुल विभागाच्या 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधुन जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखन आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक व ठाणे हे 10 जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले जातात. तसेच समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड हे  14 जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडले जातात. जुन्या नागपूर मुंबई मार्गावरुन नागपूरहून मुंबईकडे येण्यास 17-18 तास लागतात. नवीन “ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे” ने प्रवास 8 तासात करणे शक्य होणार आहे. आता मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ते नागपूरस्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरुन जलद वाहतूक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहोचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरलेला आहे.

हा महामार्ग दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा – वेरुळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ही खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे.

वैशिष्ट्यांनी समृद्ध महामार्ग

राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असेलला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिकी कौशल्यासह अनेक वैशिष्ट्यानींही  समृद्ध असा महामार्ग आहे. दळणवळणाची गतिमान घौडदौड साध्य करत पर्यंटन, उद्योग, शेतमालाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यास सहाय्यक ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावरुन  आतापर्यंत अंदाजे दोन कोटी वाहनांनी प्रवास करत सुखद, रहदारीमुक्त सुलभ, गतिमान  प्रवासाचा  अनुभव घेतला आहे.

सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी. ची लांबी  ही  नाशिक व ठाणे या दोन  जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण 5 दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील पॅकेज 14 (इगतपुरी) येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे.

प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी  अग्निशमन यंत्रणा

अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसविण्यात आलेली आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे.   त्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाहतूक अधिक जलद होणार आहे, कसारा घाटातील वाहतूक अधिक गतीमान होण्यासही  त्यामुळे सहाय्य होणार आहे.

सर्वाधिक लांबीचा पूल

भौगालिक परिस्थितीतून   मार्ग काढत महामार्गाचे काम पुढे नेत असताना नाशिक व ठाणे या जिल्ह्यातील  76 किमीच्या डोंगर दऱ्यामुळे व्हायाडक्ट (मोठे पूल) व बोगदे बांधणे हे मोठे जिकरीचे होते. काही ठिकाणी कठीण खडकात 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या टप्प्यात एकूण 17 व्हायाडक्ट (मोठे व्हॅली पूल) असून त्याची  एकूण लांबी 10.56 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.12 कि.मी) आहे.  या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) 2.28 कि.मी लांबीचा आहे. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-2) पुलाच्या काही खाबांची उंची 84 मीटरपर्यत आहे.

इंटरचेंजेस

या टप्प्यात इगतपुरी, खुटघर व आमणे येथे इंटरचेंज येतात. या शेवटच्या टप्यात मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी  दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थंलातरित कराव्या लागल्या, त्यामध्ये  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या कमी दाबाच्या 62 वाहिन्या स्थंलातरित करण्यात आलेल्या आहेत, तसेच, टोरेंट पॉवरच्या 5 विद्युत वाहिन्या व पॉवर ग्रीडची 1 विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तसेच, या टप्प्यात 1 रेल्वे ओलांडणी पुल बांधण्यात आलेला आहे.

पर्यावरण पूरक

प्रकल्पामध्ये वन्यजिव संरक्षणासाठी एकूण १०० बांधकामे पूर्ण झाली असून, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ‘ध्वनी रोधक’ ची तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याची प्रक्रिया सुरु आहे.  तसेच   या प्रकल्पामध्ये एकूण २०३  मेगा व्हॅट सौर उर्जा निर्मिती प्रस्तावित आहे.

प्रवासातील सुलभता

इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरु झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजतेने शक्य  होणार आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपला  प्रवास सुलभरित्या व जलदपणे करणे शक्य होणार आहे.  त्यासोबतच शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील            शेतकऱ्यांना आपला  शेतमाल सुलभतेने  कमी कालावधीत  मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवता येणार आहे.  शेतकरी, उद्योजक, प्रवाश्यांना मुंबई महानगर प्रदेशात कामानिमित्त वरचवेर येणे जाणे हे अधिक सोयीस्कर होणार असून शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक संधीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीनेही हा महामार्ग निश्चितच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यक ठरणारा आहे.

राज्याच्या उपराजधानीला  राज्याच्या राजधानीपर्यंत जोडणार  नागपूर ते मुंबई दरम्यानचे अतंर अवघ्या आठ तासांवर आणणारा समृद्धी महामार्ग निश्तिच महाराष्ट्राच्या औद्यागिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासालाही गतिमान करणारा ठरेल, यात शंका नाही.

००००

शब्दांकन – वंदना  थोरात, वारेगावक

विभागीय संपर्क अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *