सिंधुदुर्ग मधील शिरोडा-वेळागर येथे ताज ग्रुपच्या पर्यटन प्रकल्पाला गती

मुंबई, दि. १८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मे.इंडियन हॉटेल्स प्रा.लि.(ताज ग्रुप) आणि शिरोडा-वेळागर जमीन मालक को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई आणि मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील कॅबिनेट हॉलमध्ये हा करार झाला. यावेळी मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थितीत होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंडारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे, मे.इंडियन हॉटेल ताज ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनित चाटवाल, कार्यकारी उपाध्यक्ष राजेंद्र मिश्रा, शिरोडा-वेळागर जमीन मालक को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या करारामध्ये स्थानिक समुदायाच्या हिताचा विशेष विचार करण्यात आला आहे. प्रकल्प परिसरातील २३ स्टॉलधारकांचे स्टॉल पिकनिक स्पॉट, पार्किंग क्षेत्रात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पग्रस्त पात्र व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक युवकांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी ताज ग्रुपकडून कौशल्य विकास व प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत किंवा त्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. शिरोडा-वेळागर येथील पर्यटन विकासामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षमतेला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि कौशल्य विकासाला बळ मिळणार आहे. स्थानिक समुदायाचा सहभाग आणि त्यांचे हित जपत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. शासनाने ३० जून २०२६ रोजी मे. इंडियन हॉटेल्स कंपनी लि.(ताज ग्रुप) यांच्यासोबत करारनामा करण्यास मान्यता दिली होती.

०००

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *