सिंधुदुर्गनगरी, दि. १८ : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स परिसरात साकारत असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशातील सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण देणारा ठरणार आहे. भारतीय नौदलाची अभिमानास्पद युद्धनौका आयएनएस गुलदार सेवामुक्त झाल्यानंतर आता या युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील अद्वितीय पर्यटन केंद्रात करण्यात येत आहे. समुद्रतळाशी नियोजित पद्धतीने विसर्जित करण्यात येणारी ही युद्धनौका पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक संपदेचा शाश्वत विकास साधत पर्यटन क्षेत्राला नवे आयाम देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अंडरवॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्पामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. स्थानिक युवकांना रोजगार, पर्यटन व्यवसायाला गती आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
तारकर्ली येथील इसदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे बोलत होत्या. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, माझगाव शिपयार्डचे निपेंद्र निरव, पाणबुडी तज्ज्ञ सुनील कोरटी, एमटीडीसीचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे, वरिष्ठ व्यवस्थापक (जल पर्यटन) क्षिप्रा बोरा, व्यवस्थापक (बांधकाम) दीपक हरणे आणि प्रादेशिक अधिकारी दीपक माने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्राखाली कृत्रिम प्रवाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी जीवसृष्टीला पोषक अधिवास उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी जैवविविधतेचा अनोखा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता ‘अंडरवॉटर टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. सागरी पर्यटन, साहसी पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा हा प्रकल्प राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठीही एक मैलाचा दगड ठरणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले की, गुलदार पाहण्यासाठी पाणबुडी निर्मितीचे काम सुरू आहे. दीड वर्षात पाणबुडी तयार होऊन पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारतीय नौदलातील सेवामुक्त युद्धनौका असलेली आयएनएस गुलदार अनेक दशकांपासून देशसेवेत कार्यरत होती. सैनिक, उपकरणे आणि आवश्यक साहित्य वाहून नेण्यापासून ते विविध समुद्री आणि किनारपट्टी संरक्षण मोहिमांपर्यंत या जहाजाने मोलाची कामगिरी बजावली. जवळपास चार दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर आता या जहाजाचे रूपांतर समुद्राखालील पर्यटन आणि समुद्री जीवसंवर्धनाच्या केंद्रात करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किनारपट्टीजवळील निवती रॉक्स परिसरात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. समुद्रतळापासून सुमारे 22 मीटर खोलीवर हे जहाज सुरक्षितपणे स्थापित केले जाणार आहे. वैज्ञानिक अभ्यासानंतर निवडण्यात आलेले हे ठिकाण समुद्री पर्यटन आणि जैवविविधतेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जात असल्याचेही ते म्हणाले.
पर्यटन, संवर्धन आणि इतिहासाचा संगम
हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून समुद्री पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वारशाचा पुनर्वापर आणि साहसी पर्यटन यांचा सुंदर संगम ठरणार आहे. अंडरवॉटर म्युझियम म्हणजे समुद्राखाली तयार केलेली अशी रचना, जी स्कुबा डायव्हर्स आणि पर्यटकांसाठी खुली असते. यात समुद्री जीवसंवर्धन, साहसी पर्यटन, संशोधन आणि जनजागृती यांचा समावेश असतो.
भारताचे नवे डायव्हिंग डेस्टिनेशन
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग भारतातील प्रमुख डायव्हिंग केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येथे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटन, समुद्राखालील फोटोग्राफी, मार्गदर्शकांसह डायव्हिंग टूर तसेच समुद्र शिक्षण आणि संशोधनाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. समुद्राच्या तळाशी विसावलेली युद्धनौका, तिच्याभोवती फिरणारे रंगीबेरंगी समुद्री जीव आणि कृत्रिम प्रवाळांचा विस्तार हा पर्यटकांसाठी रोमांचकारी अनुभव ठरणार आहे.
पर्यावरण सुरक्षेला प्राधान्य
या प्रकल्पासाठी गोवा येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमार्फत सखोल वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासानुसार या परिसरात नैसर्गिक प्रवाळ नसल्याचे स्पष्ट झाले असून, दीर्घकालीन पर्यावरणीय लाभ लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
जहाजातील सर्व घातक आणि प्रदूषणकारक घटक पूर्णपणे हटवून ते पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित करण्यात आले आहे. तसेच जहाजाच्या 500 मीटर परिसरात मासेमारी आणि अँकर टाकण्यास बंदी प्रस्तावित करण्यात आली असून, समुद्री जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना
या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण, पर्यटन मार्गदर्शक, बोट सेवा, फोटोग्राफी, हॉटेल व्यवसाय आणि इतर पर्यटनपूरक उद्योगांना चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकण्यासाठी या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.
समुद्री संवर्धन, साहसी पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा अनोखा मेळ साधणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या पर्यटन इतिहासातील नवा मैलाचा दगड ठरणार आहे.