सिंधुदुर्गच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे प्रशासकीय यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर —मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १८: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा प्रभावी वापर करणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या एआय आधारित मॉडेलची दखल नीती आयोग यांनी घेतली असून, प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठक मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सोमनाथ बागुल, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव ठाकूर, सहसचिव संदीप जाधव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे दीपक केंद्रे, कृषी विभागाचे चंदनशिवे, वित्त विभागाचे उपसचिव तानाजी पवार यासह जलसंधारण आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले की, विकासप्रक्रियेला वेग मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व इतर शासकीय आस्थापनांमध्ये प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्याचे मोलाचे योगदान आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा वेग कायम राखण्यासाठी वरिष्ठ व अत्यावश्यक पदे त्वरित भरण्याचे  निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

०००

किरण वाघ/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *