शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

बीड, दि. 14 : (जिमाका)  गावागावातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणे आणि शासनाच्या सर्व योजना थेट प्रत्येक नागरिकापर्यंत  पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महसूल विभागासह विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना त्यांच्या गावातच मिळावा यासाठी राज्य शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ मंडळ स्तरावर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरांचा प्रभावी वापर करून गावातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

बीड तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पापळकर पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठीच मंडळ स्तरावर शिबिरे घेण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांसह शासनाच्या समाजोपयोगी योजनांची माहिती व लाभ नागरिकांना दिले जाणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी शेतपांदण रस्ते, बांधावरील मार्ग यासंदर्भात अनेकदा वाद-विवाद निर्माण होतात. अशा समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने शेतपांदण रस्ते उपक्रम सुरू केला असून तो ३० मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

गावागावातील प्रश्न सोडवताना तलाठी, सरपंच आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांच्या समन्वयातून उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. या शिबिरांमध्ये संजय गांधी निराधार योजना, वारसा हक्काचे फेरफार, जिवंत सातबारा, आयुष्मान भारत आरोग्य योजना यांसह विविध योजनांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण केले जात आहे.  गावातील प्रत्येकाने पक्षीय भेदभाव बाजूला ठेवून गावकऱ्यांच्या समस्या या शिबिरात मांडाव्यात आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त पापळकर यांनी केले.

प्रशासनातील अधिकारी अथवा कर्मचारी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात टाळाटाळ करत असतील तर नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिरात प्रातिनिधिक स्वरूपात जातीचे प्रमाणपत्र, आयुष्मान भारत आरोग्य कार्ड, गरोदर मातांना आरोग्य किट यांसह विविध योजनांतील लाभांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुहास हजारे, तळेगावचे सरपंच तसेच परिसरातील इतर गावांचे सरपंच आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कुटुंबाला हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा

पारधी समाजातील आप्पा भुजा पवार यांनी आपल्या कुटुंबाला हक्काचे घर मिळावे आणि मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष केला. मात्र, दुर्दैवाने सन २०२३ मध्ये त्यांचे निधन झाले. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेत पवार कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तळेवाडी येथे एक एकर जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली. आज या संदर्भातील पुढील कार्यवाही छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पार पडली.

या निर्णयामुळे संबंधित कुटुंबाला हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या पुनर्वसनाला मोठी मदत होणार आहे. आप्पा पवार यांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी केलेल्या संघर्षाला अखेर न्याय मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *