शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ११: एकविसाव्याशतकात ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे फक्त भारतीय तत्वज्ञान नाही, तर दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. या तत्त्वज्ञानासह भारताने नेहमीच विविध क्षेत्रात सहकार्याचा हात पुढे करत ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद केला आहे. आपली शहरे उत्तम, सर्वसमावेशक आणि भविष्याला आकार देणारी ठरण्यासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याचे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ परिषदेचे उद्घाटन झाले. ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेतर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती,  ‘मुंबई फर्स्ट’चे अध्यक्ष नरिंदर नायर, उपाध्यक्ष अशांक देसाई आदी उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, आपली शहरे नवोन्मेष आणि सर्जनशीलतेची इंजिने आहेत. शहरांचा विस्तार होत असताना नागरिकांना राहण्यायोग्य शहरांची निर्मिती ही खरी कसोटी आहे. या पार्श्वभूमीवर विविध पातळ्यांवर ब्रिक्स देशांचे परस्पर सहकार्य हे विशेष महत्वाचे ठरते. आपल्या देशांमध्ये विविधता असली, तरी आपल्या समाजांची आकांक्षा समान आहे. तरुण लोकसंख्या, विस्तारणारी शहरे आणि बदलती अर्थव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, हवामान, डिजिटल प्रशासन, परवडणारी घरे अशा विविध क्षेत्रांत ब्रिक्स देशांनी अनुभव आणि तंत्रज्ञानाचे आदानप्रदान करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संत तुकाराम महाराज यांच्या ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिक्स देशांतील शहरांनी परस्पर सहकार्याने विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचे आवाहन केले. ब्रिक्स देशांनी एकमेकांना प्रगत तंत्रज्ञान, अनुभव, ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे. अशा परस्पर सहकार्यातूनच देश जवळ येतील, जागतिक विकासाला खरी गती मिळेल आणि प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

मुंबई फर्स्ट संस्थेचे अध्यक्ष नरिंदर नायर यांनी प्रास्ताविकात या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. संस्थेचे उपाध्यक्ष अशांक देसाई यांनी आभार मानले. या परिषदेत ब्रिक्स देशांतील शहरांचे प्रतिनिधी, महापौर, नगर नियोजन तज्ज्ञ, शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.

 

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *