विधानसभा लक्षवेधी

कर्करोगाबाबत जागृती, तपासणी आणि उपचार अशा तीन स्तरावर मोहीम; नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर 

मुंबई, दि. २४ : राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या तातडीने निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी नागरिकांमध्ये जागृती वाढविण्यात येत असून नागरिकांनी या तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. कर्करोग तपासणीसाठी राज्यात सध्या आठ वाहने असून यांची संख्या वाढवून सर्व जिल्ह्यांमध्ये वाहने उपलब्ध करुन दिली जातील, असे त्यांनी सांगितले. महिलांमधील स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील तपासणीवर भर देण्यात येत असून याअंतर्गत 3 कोटी 20 लाख महिलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री अमीन पटेल, रईस शेख, बाबासाहेब देशमुख, भास्कर जाधव, राजकुमार बडोले, शेखर निकम, दिलीप लांडे, तमिल सेल्वन, समीर कुणावार, किशोर पाटील, सुलभा खोडके, देवयानी फरांदे आदींनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, 16 ऑक्टो 25 च्या शासनाच्या धोरणाप्रमाणे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर अशा तीन स्तरावर उपचार पद्धती राबवून जागृती, तपासणी आणि उपचार यावर भर दिला जात आहे. 26 ठिकाणी पीपीपी तत्वावर रेडिओथेरपीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने 9 ते 13 वर्ष वयोगटातील मुलींच्या तपासणीची मोहीम देशभरात सुरू होणार असून त्यांचे लसीकरण देखील करण्यात येईल. मुंबईत कर्करोगाच्या तपासणी आणि उपचाराबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल. कोकणामध्ये कर्करोगाच्या तपासणीसाठी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच कर्करोगाच्या औषधांच्या किंमतीसंदर्भात कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचाराची तरतूद करण्यात आली आहे. किमो थेरपी आणि रेडिएशनसाठी उपचारांच्या खर्चाचा या योजनेत समावेश असून पेट स्कॅनची सुविधा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील चर्चेच्या उत्तरात सांगितले.

०००००

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन निर्णय घेणार -अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई,दि. २४ : यावर्षीच्या हंगामामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडील बैठकीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते. सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, विनोद अग्रवाल, नितीन राऊत, भास्कर जाधव, मोहन मते, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, अर्जून खोतकर, दिलीप लांडे आदींनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने २०१३ पासून प्रोत्साहन रक्कम देण्याची सुरूवात झाली आहे. ही योजना राज्यभर लागू असून नोंदणी केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. २०२४-२५ यावर्षी ७ लाख २७ हजार ५४८ नोंदणीकृत शेतकऱ्यांना १६३६ कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम देय होती. यापैकी १५८६ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. पणन हंगाम २०२५-२६ मध्ये एकूण ७ लाख १६ हजार ३३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून २२ फेब्रुवारी २०२६ अखेर ८८ लाख ७४ हजार २७० ‍क्विंटल धानाची किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली आहे. वर्ष २२-२३ या वर्षी १५ हजार असलेली प्रोत्साहन रक्कम २३-२४ ला २० हजार रुपये इतकी वाढवली गेली आहे. ही रक्कम वाढविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *