विधानपरिषद प्रश्नोत्तरे

भुयाचीवाडी येथील बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार – मंत्री राधाकृष्ण विखेपाटील

मुंबई, दि. १७ : कृष्णा नदीवरील भुयाचीवाडी (ता. कराड जि. सातारा) कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन कायमस्वरुपी बंधारा बांधण्याच्या मागणीचा विचार करून या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेज बंधाऱ्यात करण्यात येणार असल्याचे जलसंपदा ( मराठवाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अमित गोरखे यांनी या विषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, कृष्णा नदीवरील भुयाचीवाडी (ता. कराड जि. सातारा)  कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस सुमारे ४५० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. पाण्याचा वेग आणि नदीतील प्रवाहामुळे  या बंधाऱ्याचे वारंवार नुकसान होत असल्याने दरवर्षी यांत्रिकी पद्धतीने तात्पुरती दुरुस्ती करून भराव टाकण्याचे काम केले जाते. मात्र ही तात्पुरती उपाययोजना असल्याने या बंधाऱ्याचे बॅरेज बंधाऱ्यांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया शासनाने हाती घेतली आहे. या कामासाठी निधीची अडचण नाही.

या बंधाऱ्याच्या कामासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचेही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

०००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

 

जिगांव धरणाखालील रस्ता कामात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई; तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि.१७ : जिगांव प्रकल्पांतर्गत जिगांव धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या रस्ता दुरुस्ती बांधकाम  या  कामाच्या निविदा प्रकरणी मे. निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नंदुरबार यांनी बोगस कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्यात येऊन या कंत्राटदारास तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहिती जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री  गिरीश महाजन विधानपरिषदेत दिली.

सदस्य अभिजित वंजारी यांनी या संदर्भात विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, जिगांव प्रकल्पांतर्गत जिगाव धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या रस्ता दुरुस्ती कामासाठी १५ कोटी ६३ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने निविदा भरताना सादर केलेल्या कागदपत्राबद्दल तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत  चौकशी पूर्ण करण्यात आली. या चौकशीत कंत्राटदाराने बनावट अनुभव प्रमाणपत्रे वापरून टेंडर मिळवल्याचे निदर्शनास येताच त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून त्याची ३१ लाख २८ हजार रुपयांची बँक हमीही जप्त करण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री  महाजन यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

०००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

 

राज्यात सोयाबीन खरेदी वेळेत – मंत्री संजय सावकारे

मुंबई, दि. १७ : राज्यात सोयाबीन खरेदी प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात आली असून कोणत्याही शेतकऱ्याला खरेदीसाठी नकार देण्यात आलेला नाही, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य सदाभाऊ खोत यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री संजय सावकारे म्हणाले, ३० ऑक्टोबर २०२५ पासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली होती, तर १५ नोव्हेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. ही खरेदी प्रक्रिया ९० दिवस चालून १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण झाली. काही ठिकाणी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी यामागे बाजारभावातील बदल हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. बाजारात चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विक्री करण्यास प्राधान्य दिले. राज्य शासनाची हमीभाव खरेदी व्यवस्था ही शेतकऱ्यांना किमान दर मिळावा आणि त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी असून, बाजारात अधिक दर मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; जळगावसह काही भागांत कर्जवसुलीला स्थगिती – मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, दि. १७ : सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने जळगावसह काही भागांमध्ये कर्जवसुलीला स्थगिती दिली असल्याची माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य सदाभाऊ खोत, प्रविण दरेकर, अमोल मिटकरी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील कर्जवसुली प्रक्रियेला गती मिळत असून, 31 मार्च 2026 पर्यंत सुमारे 500 कोटी रुपयांची वसुली होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून जळगाव बँकेसाठी 800 कोटी रुपयांचे अतिरिक्त अल्पमुदत कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

खरीप व रब्बी हंगामासाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट एकूण 1403.86 कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करण्यात आले आहे. पुढील खरीप हंगामासाठीही 1200 ते 1300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

कर्ज पुनर्गठनाबाबत शेतकऱ्यांची संमती आवश्यक असून, निर्धारित मुदत संपल्यानंतर पुनर्गठन करणे शक्य नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

मुंबई पोलीस हाऊसिंग प्रकल्पात विलंब; आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष लेखापरीक्षण सुरू – मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, दि. १७ : मुंबई पोलीस हाऊसिंग प्रकल्पातील आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींनंतर याबाबत लेखापरीक्षण सुरू करण्यात आली असल्याची माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भाई जगताप, प्रविण दरेकर, सचिन अहिर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, मुंबई पोलीस हाऊसिंग प्रकल्पातील प्राप्त तक्रारींनुसार सभासदांची परवानगी न घेता कंत्राटदार नेमणे आणि मोठ्या प्रमाणावर निधी अदा करणे, तसेच जमीन खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सुरुवातीपासून ते २०२२ पर्यंतच्या कालावधीचे फेरलेखापरीक्षण करण्यासाठी विशेष लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या लेखापरीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामधील निष्कर्षांच्या आधारे सहकार कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच सभासदांना न्याय मिळावा यासाठी लवकरच बैठक घेऊन अहवाल सादर केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *