वडार समाजाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २ : वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळामार्फत वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

राज्यातील वडार समाजाच्या प्रलंबित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीला आमदार अभिमन्यू पवार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री अतुल सावे म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत वडार समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील नागरिकांनी जनजागृती करून विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच राज्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या वसतिगृहांमध्ये वंचित घटकांसाठी आरक्षण उपलब्ध असून वडार समाजातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

वडार समाजातील बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ करणे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २.५ लाख रुपयांच्या अनुदानासोबतच, राज्याच्या कामगार कल्याण मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना नवीन घरकुलासाठी अतिरिक्त २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री सावे यांनी दिले.

वडार समाजाचा पारंपरिक व्यवसाय दगडफोड, खाणकाम आणि मातीकामाशी संबंधित असल्याने जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि पंचायत समिती स्तरावरील काही कामे समाजासाठी राखीव ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेने वडार समाज सेवा संघ’ यांना २० गुंठे जागेवर विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. तसेच वडार समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे सुलभपणे मिळावीत यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाला देण्यात आले.

या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका सोनाली मुळे, अखिल भारतीय महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे कार्याध्यक्ष पिराजी मंजुळे, भाजप भटके विमुक्त आघाडीचे सरचिटणीस रविंद्र शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

0000

शैलजा पाटील/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *