लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सव’

मुंबई, दि. २०: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महासंस्कृती अंतर्गत राज्यातील सांस्कृतिक परंपरा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘सांस्कृतिक महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव १९ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० वाजता याअंतर्गत लोअर परळ ब्रिज खाली, कोकण वैभव समोर, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३ येथे कार्यक्रम होतील.

या सांस्कृतिक महोत्सवात संगीत, नृत्य, लोककला, पारंपरिक कला प्रकार तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे स्थानिक समन्वय शेलारमामा फाऊंडेशन, कुलस्वामिनी श्री भैरी भवानी चैत्र नवरात्रोत्सव यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

मुंबई व परिसरातील नागरिक, कलाकार, विद्यार्थी तसेच सर्व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *