माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुंबई, दि. १५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत देशाच्या माध्यम व मनोरंजन क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेमुळे (वेव्ह्ज) या क्षेत्राच्या वाढीची प्रचिती आली, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी केले.

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात Mumbai International Film Festival (मिफ्फ) चे मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते जयदीप अहलावत, आयडीपीए अध्यक्ष संस्कार देसाई, अध्यक्ष किरण शांताराम, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, एनडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांच्यासह चित्रपटसृष्टीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुरुगन म्हणाले की, भारताची सर्जनशील राजधानी असलेल्या मुंबईत मिफ्फसारख्या प्रतिष्ठित महोत्सवाचे आयोजन होत असल्याचा आनंद आहे. भारत आज जगाच्या नजरेत एक सर्जनशील महासत्ता आणि विश्वासार्ह कंटेंट निर्मिती भागीदार म्हणून उदयास आला असून भारतीय कथा जगभरातील प्रेक्षकांना प्रेरणा देण्याची क्षमता बाळगत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाने 2023 मध्ये 9 टक्क्यांची वाढ नोंदवत 2.78 ट्रिलियन रुपयांचा टप्पा गाठला असल्याचे सांगताना त्यांनी डिजिटल माध्यमांनी प्रथमच 1 ट्रिलियन रुपयांहून अधिक महसूल प्राप्त केला असल्याचे नमूद केले. 2028 पर्यंत हे क्षेत्र 3.3 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून वार्षिक 7 टक्क्यांहून अधिक वाढ कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात 2023 मध्ये 1,900 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले असून चित्रपटगृहांच्या महसुलात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. दूरचित्रवाणी अजूनही दर आठवड्याला सुमारे 74.5 कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून ओटीटी आणि डिजिटल माध्यमांची भूमिकाही वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

मिफ्फ अंतर्गत आयोजित करण्यात येणारा ‘वेव्हज डॉक्युमेंटरी बाजार’ हा माहितीपट, निर्माते आणि जागतिक वितरक यांच्यातील दुवा ठरत असल्याचे राज्यमंत्री डॉ. मुरुगन यांनी सांगितले. हा उपक्रम माहितीपट निर्मितीच्या विविध टप्प्यांवर आवश्यक मार्गदर्शन, बाजारपेठेची माहिती, वितरण धोरणे आणि जागतिक संधी उपलब्ध करून देतो. त्यामुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निर्मात्यांना आपल्या कल्पना जागतिक स्तरावर नेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या महोत्सवाचे कौतुक करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुरुगन म्हणाले की, मिफ्फसारखे व्यासपीठ भारताला जगातील अग्रगण्य सर्जनशील केंद्र बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला बळ देत आहे. माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्यास दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई हे स्वप्नांचे, आनंदाचे आणि सर्जनशीलतेचे शहर असून जगभरातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सर्जनशील कलाकारांनी मुंबई व महाराष्ट्रातील सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री डॉ. मुरुगन यांचे आभार मानताना तीन महत्त्वाच्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. ‘वेव्ह्ज’ या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल परिषदेची सुरुवात मुंबईत करण्यात आली असून ती सर्जनशील क्षेत्रासाठी मोठी संधी ठरत आहे. तसेच देशातील पहिले ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) मुंबईत सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या सर्जनशीलतेचा उल्लेख करताना मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, हे शहर नवकल्पना आणि संस्कृतीसाठीही ओळखले जाते. येथील सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा अनुभव देश-विदेशातील पाहुण्यांना घेता येईल. चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, महाराष्ट्रातील शासकीय जागांवर चित्रिकरणासाठी निर्मात्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच विविध विभागांकडून परवानग्या मिळविण्यासाठी ‘वन विंडो सिस्टीम’ सुरू करण्यात आली असून सर्व परवानग्या मिळविण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे.

केंद्र शासनाच्या सहकार्याने मुंबईतील आकाशवाणीच्या विस्तीर्ण जागेवर अत्याधुनिक मीडिया हब उभारण्याची योजनाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या सुविधेमुळे मीडिया आणि सर्जनशील उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे ते म्हणाले. लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपट हे सर्जनशीलतेचे आव्हानात्मक आणि प्रभावी माध्यम असल्याचे सांगत मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जागतिक दर्जाच्या सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय सचिव चंचल कुमार तर एनडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिनेते जयदीप, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ज्युरी, प्रेस ज्युरी, स्क्रू कॉस्ट यांना सन्मानित करण्यात आले.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *