माजी सैनिक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील अडचणी दूर करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २८: माजी सैनिक कल्याण महामंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील अडचणी दूर करून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुसूत्रता आणावी, असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. माजी सैनिक कल्याण महामंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार, मेस्को व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन कौस्तुभ गोसावी, कार्यकारी संचालक नितीन वाघ, मुख्य औद्योगिक रिलेशन अधिकारी मुकेश मेश्राम, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, तसेच राजेश कुंभार, राजीव, राजेश लोंढे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

माजी सैनिकांच्या सेवेला न्याय मिळावा तसेच त्यांच्या कल्याणास प्राधान्य दिले जावे, या दृष्टीने शासन कटिबद्ध असून यासंदर्भात तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले.

माजी सैनिकांच्या सन्मान आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन ठाम असून या संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *