बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुबलक कृषि निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करा
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा

 परभणी, दि. ९५ (जिमाका) : शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करणे, खतांचा काळाबाजार, सक्तीची जोडविक्री व निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज येथे  जिल्हा यंत्रणा प्रमुखांना दिले.

खरीप हंगाम 2026 ची आढावा बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील खरीप हंगामातील तयारी, बियाणे व खतांची उपलब्धता, कृषी योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला खासदार संजय जाधव, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा‍ अधीक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यात खतांचा पुरेसा राखीव साठा उपलब्ध ठेवण्यात यावा, पारंपरिक युरिया व डीएपीला प्रभावी पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’च्या वापरास प्रोत्साहन द्यावे. सर्व कृषी सेवा केंद्रांवर खतांचे दर व उपलब्ध साठा दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश  दिले.

पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, बोगस बियाण्यांचा प्रसार, खतांचा तुटवडा टाळावा व जिल्ह्यातील कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात पाणीटंचाई भासणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

यावेळी खासदार संजय जाधव आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही सूचना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप चॅटबॉटशी जोडण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, एल निनोचा प्रभाव आणि विविध कृषी उपाययोजनांबाबतची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. खत साठ्याबाबत दुकानदारांकडून दररोज उपलब्ध साठ्याचा फोटोसह अहवाल नोंदविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सन 2026 मध्ये मराठवाड्यात 88 टक्के पर्जन्यमान होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील अधिकाऱ्यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी आत्मा प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक शेतीबाबत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती, मागील वर्षाच्या पर्जन्यमानाची माहिती, सन २०२६ मधील संभाव्य पर्जन्यमानाचा अंदाज, आपत्कालीन पीक व्यवस्थापन, एल निनोच्या प्रभावामुळे करावयाच्या उपाययोजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२५, हवामान आधारित फळबाग योजना, माती परीक्षण, ॲग्रीस्टॅक, गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह योजना तसेच खरीप हंगाम २०२६ साठी खत व बियाणे नियोजनाबाबतची माहिती पीपीटी सादरीकरणाद्वारे  दिली.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *