पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 10 :- सातारा शहरातील पोवई नाक्यावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचे उर्वरित सर्व काम अत्यंत वेगाने आणि तातडीने पूर्ण करण्यात यावे. लवकरच या स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याने सर्व यंत्रणांनी वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. आढावा बैठकीला नगराध्यक्ष अमोल मोहिते, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ऐतिहासिक प्रतापगडावरील संवर्धन आणि विविध विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी  कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. प्रतापगड येथील संवर्धनाची सर्व कामे येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करावीत. गडावर येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवप्रेमींना प्रतापगडाचा जाज्वल्य इतिहास व्यवस्थित समजावा यासाठी विशेष पटकथा तयार करण्यात यावी. यासाठी तज्ज्ञ इतिहासकारांची मदत घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

किल्ले प्रतापगडावर भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ७० जणांची बसण्याची क्षमता असलेले सुसज्ज प्रेक्षागृह तयार करण्यात यावे. गडावरील संवर्धन, प्रेक्षागृह निर्मिती आणि इतर सर्व कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकाच मुख्य एजन्सीची नियुक्ती करावी, जेणेकरून कामांचा दर्जा उत्तम राहील आणि सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण होतील, अशा सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

बांधकाम विभागाने किल्ले प्रतापगडाची माहिती त्याचा इतिहास पर्यटकांसाठी असणाऱ्या सुविधांचा समावेश असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हीडीओ क्लिप तयार करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

बोर्गेवाडी (मेंढोशी) ता. पाटण गावाचा पुनर्वसन आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले या गावातील 89 कुटुंब बाधित आहेत. त्यांचे मौजे सडावाघापूर येथे पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. ही जागा अंतिम करावी. बाधित कुटुंबाला किमान तीन गुठ्ठे जागा मिळावी. या पुनर्वसनाचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक तयार करुन तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी करंजे नाका येथे उभारण्यात येणाऱ्या सैनिक संकुलच्या जागेची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *