पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

नवी दिल्ली, दि. 21 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जन्म जयंती साजरी केली जाते. यंदा अहिल्यादेवी होळकर यांची  300 वी जयंती त्यांच्या जन्म गावी अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे भव्य स्वरूपात होणार आहे. त्याचे निमंत्रण राष्ट्रपती यांना देण्यासाठी आज श्री. शिंदे आले असून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  यावेळी सांगली महानगर पालिकेच्या महापौर संगिता खोत, ॲड. वीणा सोनवलकर, डॉ. उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे, मानिका गहानवर या उपस्थित होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान आहे. त्या काळात समाजातील रूढी पंरपरेला झुगारून त्यांनी धर्माचे, संस्कृतीचे रक्षण केले. देशभरातील 12 ज्योर्तिलिंगांचा जीर्णोध्दार त्यांनी केला. काशी विश्वनाथ मंदिराची पुर्नबांधणी, अनेक ऐतिहासीक धार्मिक स्थळांवरील घाटांचे निर्माण, विहीरींचे बांधकाम, रस्त्यांच्या कडेवरील वृक्षारोपण असे अनेक कामे त्यांच्या हातुन घडलीत, अशी माहिती श्री शिंदे यांनी यावेळी सांगितली. चौंडी या त्यांच्या जन्मगावी होणाऱ्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रामात यापुर्वी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आल्याचे त्यांनी यावेळी सांग‍ितले.

याच महिन्यात 6 मे 2025  रोजी अहिल्यानगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देत श्री शिंदे यांनी सांगितले, या मंत्री मंडळाच्या बैठकीत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.  चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिलेली आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *