पीक विम्यासंदर्भातील जिल्हास्तरावरील प्रकरणे तात्काळ निकाली काढा –  कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. 4 : शासनाने केलेल्या पिक नुकसान अहवालावर आधारित पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. कोणताही शेतकरी पिक विम्यातून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

मंत्रालयात नाशिक, नांदेड व परभणी जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार डॉ.राहुल आहेर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक इ.शा.नायकवडी, विजयकुमार औटी उपस्थित होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीव्दारे परभणी, नांदेड व नाशिकचे जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ॲड. कोकाटे म्हणाले की, पिक विमा कंपन्यांनी जे दावे फेटाळले आहेत ते तपासून घ्यावेत. तसेच जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपन्यांनी शासनाकडे केलेले अपील लवकरात लवकर निकाली काढून शेतकऱ्‍यांनी पिक विम्याचे वेळेत वाटप करावे. यामध्ये कृषी विभाग व विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. सर्व पात्र पिक विमा धारकांना नियमानुसार लाभ मिळेल याची यंत्रणांनी कटाक्षाने खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *