पल्स वैद्यकीय परिषद २०२६ यशस्वी; आरोग्य क्षेत्रास परिवर्तनाची नवी दिशा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. २८ : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नव्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पल्स वैद्यकीय परिषद 2026 महत्त्वपूर्ण ठरली असून, या परिषदेतून नवोन्मेष, गुंतवणूक आणि सहकार्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

समारोप सत्रास संबोधताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले की, बल्क ड्रग पार्क आणि औषधनिर्मिती क्षेत्रावरील चर्चांमुळे स्वावलंबनाला चालना मिळणार असून, स्टार्टअप्सच्या सहभागामुळे नव्या व्यवसाय संधी निर्माण होत आहेत. या उपक्रमाचा सुमारे चार हजार विद्यार्थी, आरोग्य व्यावसायिक, संशोधक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना—थेट लाभ होणार आहे.

दोन दिवसीय परिषदेचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘महाराष्ट्र घोषणापत्र’मुळे सहकार्य, पायलट प्रकल्प आणि व्यापक उपाययोजनांसाठी स्पष्ट दिशा मिळाली आहे. यामुळे परिषद केवळ चर्चांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष परिणाम देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पल्स वैद्यकीय परिषद 2026 मध्ये शासन, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भागीदार एकत्र आल्यास आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन शक्य असल्याचे स्पष्ट झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ, गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण, क्लिनिकल नवकल्पना आणि प्रतिबंधात्मक आरोग्य या क्षेत्रांमध्ये सखोल चर्चा झाली. परिषदेत उच्चस्तरीय राऊंड टेबल बैठका, विविध सत्रे आणि प्रदर्शने यांमधून तंत्रज्ञानाधारित आणि रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित झाली. तसेच शिक्षण, संशोधन आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रात 15 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य सीमांच्या पलीकडे जाऊन होणे आवश्यक आहे. परिषदेत मांडलेल्या कल्पनांना कृतीत उतरवून अधिक सुलभ, परवडणारी आणि भविष्याभिमुख आरोग्य व्यवस्था उभारण्याची वेळ आली आहे, असेही आवाहन करत मत्री मुश्रीफ यांनी केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

00000

वि.स.अ. दत्तात्रय कोकरे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *