नागरिकांच्या १०० निवेदनांवरील अनुपालनाचा पालकमंत्र्यांनी जनसंवाद सभेत घेतला आढावा

सांगली, दि. १० (जि. मा. का.) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या शासकीय जनसंवाद उपक्रमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. बहुतांश निवेदनांवर कार्यवाही होऊन प्रश्न मार्गी लागत असल्याने अनुपालन आढावा सभेत अनेकांनी पालकमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. शासकीय जनसंवाद या उपक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. 30 जुलै रोजी झालेल्या पहिल्या सभेत नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. या सभेत नागरिकांची जवळपास 100 निवेदने प्राप्त झाली होती. त्यावर गेल्या आठवडाभरात शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा या अनुपालन सभेत घेण्यात आला.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांनी प्राप्त प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संवेदनशीलतेने काम करावे. लोकाभिमुख, पारदर्शकतेने काम करत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मंत्रालय स्तरावरील प्रकरणांचा आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या शासकीय जनसंवाद अनुपालन सभेस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी ड़ॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आणि समाधान शेंडगे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. उच्च शिक्षण विभागांतर्गत प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रजा रोखीकरणबाबतचा वर्षभरापासूनच्या प्रलंबित प्रश्नाबाबत उच्च शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करून परिपत्रक काढल्याने यावेळी संबंधितांनी पालकमंत्री महोदयांचे सहर्ष आभार मानले.

यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी शेतीची नुकसान भरपाई, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, शेतीला रस्ता मिळणे, महामार्ग, शासकीय नोकरी, अनुकंपा भरती, जमिनीविषयीचे प्रश्न, अतिक्रमण हटवणे, जागेचा कब्जा मिळणे, उपसा सिंचन योजनेचे पाणी, विकासकामासाठी निधी मिळणे, विविध दाखले, सातबारा दुरूस्ती, आर्थिक सहाय्य मिळणे, अनुदान मंजुरी, वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करून मिळणे, निवृत्तीवेतन, सिटीसर्व्हे नावनोंदणी, घरपट्टी कमी करणे, शिष्यवृत्ती, कलाकार मानधन, बांधकाम परवाना असे अनेक प्रश्न मांडले. त्यातील बहुंताश प्रकरणे मार्गी लागत असल्याचे बघून उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिलाशाची भावना दिसत होती.

यावेळी अनेक नागरिकांनी त्यांचे प्रश्न सोडवल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले. प्रत्यक्ष पालकमंत्री आपले गाऱ्हाणे ऐकून घेत आहेत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सर्व विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक प्रश्नांवर त्वरित कार्यवाही सुरू झाल्याचे निदर्शनास आले. एकूणच लोकाभिमुख पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा निघत असल्याने शासन-प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

00000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *