‘टेक-वारी 2.0’ मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ८ : विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक-वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित ‘टेक-वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभाग सेवा मुख्य अतिरिक्त सचिव व्ही. राधा तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाने ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञान, संस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘टेक वारी’ची तुलना पंढरपूरच्या वारीशी करताना सांगितले की, वारीमध्ये जशी शिस्त, सातत्य, अध्यात्म आणि सामूहिकता आहे, त्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असून, प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, ‘टेक वारी 2.0’ ही केवळ कार्यशाळा नसून प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा भाग आहे. ‘विरासत से विकास तक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सांस्कृतिक वारसा जपत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी प्रत्यक्ष आणि नऊ लाखांहून अधिक कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमाशी जोडले गेले असून, हा देशातील सर्वांत मोठा तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.

टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी-कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला ‘फ्युचर रेडी’ बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात चार मेपासून आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. डीपीडीपी, नवीन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘टेक वारी’चे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कर्मयोगी भारत 2 एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या सप्ताहात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्यातील पुरस्कारप्राप्त अधिकारी-कर्मचारी तसेच मंत्रालयातील विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 

सोबत पुरस्कारांर्थीची यादी

sadhana saptah result_0001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *